वाहतूक पोलिसांचे अनोखे ‘जलमित्र’
By Admin | Published: July 23, 2016 03:03 AM2016-07-23T03:03:07+5:302016-07-23T03:03:07+5:30
आजच्या ‘डिजीटल’ युगात ‘व्हॉट्सअॅप’ ही सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील गोष्ट झाली आहे. सर्वसाधारणपणे ‘व्हॉट्सअॅप’ संपर्क व माहितीच्या...
नागपूरकर दाम्पत्याची निराळी समाजसेवा : ‘व्हॉट्सअॅप’वरून मिळाली प्रेरणा
योगेश पांडे / विशाल महाकाळकर नागपूर
आजच्या ‘डिजीटल’ युगात ‘व्हॉट्सअॅप’ ही सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील गोष्ट झाली आहे. सर्वसाधारणपणे ‘व्हॉट्सअॅप’ संपर्क व माहितीच्या आदानप्रदानासाठी वापरण्यात येत असले तरी यावरील एखादा साधा संदेशदेखील जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. नागपुरातील लाला दाम्पत्यालादेखील ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून अशीच प्रेरणा मिळाली व नागपुरातील विविध चौकाचौकात उन्हातान्हात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना हक्काचे ‘जलमित्र’ मिळाले.
रोशन लाला व पूनम लाला हे दोघेही पतीपत्नी दररोज दुपारी शहरातील विविध चौकांत ‘पाणी हेच पुण्य’ या विचारातून चौकाचौकांत उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना थंडगार पाणी वाटण्याचे काम करतात. फोनमधील संदेश अक्षरश: कृतीत उतरवत या दाम्पत्याने अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
वाहतूक पोलिसांची नोकरी तशी धकाधकीची अन् तणावाची. उन्हातान्हाची पर्वा न करता वाहनांच्या प्रदूषणाचा सामना करत त्यांना कर्तव्य बजावावे लागते. अनेकदा तर घामाघूम झाले असताना त्यांना घोटभर पाणी पिण्यासाठीदेखील बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. वाहतूक पोलिसांची ही अवस्था नागपुरातील लाला दाम्पत्याच्या मनाला टोचणी लावून गेली.
यांच्यासाठी काहीतरी करावे असे दोघांनाही नेहमी वाटायचे. परंतु नेमके काय करावे हा त्यांच्यासमोर प्रश्न असायचा.
पोलीसदेखील माणूसच आहे
नागपूर : ९ मे २०१५ च्या सकाळी ‘व्हॉट्सअॅप’वर आलेल्या एका ‘मॅसेज’नंतर या दाम्पत्याला उत्तर सापडले व त्यांचा दैनंदिन दिनक्रमच बदलून गेला. ऊन, पाऊस व प्रदूषणाचा तडाखा झेलत काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांना पाणी पाजणे हीदेखील मोठी समाजसेवा असू शकते या आशयाचा तो संदेश होता. दुसऱ्या दिवसापासून लाला दाम्पत्याने कृतीला सुरुवात केली व चौकाचौकांत ते पाणी वाटत फिरू लागले. गेल्या १४ महिन्यांपासून दररोज ते हे सेवाकार्य करत आहेत. ज्या दिवशी दोघेही बाहेरगावी असतात तेव्हा हे काम त्यांची मुले रोहण किंवा तरुण हे दोघे करतात. पाण्याच्या या बाटल्या दररोज स्वच्छ करण्यात येतात व काही दिवसांपूर्वीच स्वच्छ पाण्यासाठी या दाम्पत्याने ‘प्युरिफायर’देखील लावून घेतले आहे.
साधारणत: पोलीस म्हटले की सामान्य नागरिक नाके मुरडतात. वाहतूक पोलिसांशी तर अनेकदा अरेरावी करतात. परंतु तीदेखील आपल्यासारखीच माणसे आहेत. तासन्तास उन्हात उभे असूनदेखील त्यांना कोणी पाण्यालाही विचारत नाही हे दुर्दैव आहे.
त्यांना पाणी देऊन आम्ही खारीचा वाटा उचलतो आहे. या कामात आम्हाला प्रताप कामदार यांचीदेखील मदत होते.
तहानेने व्याकुळलेल्या या पोलिसांची तहान शमल्यावर मिळणारे समाधान मौलिक आहे, अशा भावना पूनम लाला व रोशन लाला यांनी व्यक्त केल्या.(प्रतिनिधी)
पोलिसांना असते प्रतीक्षा
दररोज सकाळी पूनम लाला घरातील ‘फ्रिज’मध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतात. दुपारी ११.३० च्या सुमारास दोघेही खामला येथील निवासस्थानातून कारने निघतात. शहरातील विविध चौकांत ते जातात व तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना पाण्याची बाटली देतात. साधारणत: दररोज हे दोघे दोन तास विविध चौकात जातात व पोलिसांची क्षुधा शमवितात. सुरुवातीला पोलिसांनादेखील या कृतीने आश्चर्य वाटले होते. परंतु आता मात्र लाला दाम्पत्य येईल कधी आणि आपल्याला पाणी मिळेल कधी या प्रतीक्षेत ‘ड्युटी’वर असलेले पोलीस असतात.