वाघोबा रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा खोळंबा, धरमखिंड-चिकना मार्गावरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 09:52 PM2019-12-18T21:52:37+5:302019-12-18T21:53:19+5:30
मार्गावरून ये जा करणाऱ्यांना काही अंतरावरच चक्क वाघोबाचे दर्शन होताच अनेकांची भंबेरी उडाली. वाघोबाच्या या रस्त्यावरील मुक्कामाने एसटी बस, खाजगी चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनचालक थांबले.
नागपूर - उमरेड येथून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या धरमखिंड ते चिकना मार्गादरम्यान वाघोबाने रस्त्यावर ठाण मांडले. या मार्गावरून ये जा करणाऱ्यांना काही अंतरावरच चक्क वाघोबाचे दर्शन होताच अनेकांची भंबेरी उडाली. वाघोबाच्या या रस्त्यावरील मुक्कामाने एसटी बस, खाजगी चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनचालक थांबले.
आज १८ डिसेंबर ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार अनेकांना बघावयास मिळाला. उमरेड येथून पचखेडी येथे एमएच १४ बी आय ०८६३ या क्रमांकाची एसटी जात होती. अशातच कुही तालुक्यातील तारणा येथून केवळ ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धरमखिंड ते चिकना दरम्यान रस्त्यावरच वाघ बसून होता. वाघ दिसताच बस थांबविण्यात आली. त्यापाठोपाठ खाजगी चारचाकी व दुचाकी वाहने सुद्धा थांबविण्यात आले. साधारणतः अर्धा तास वाघ रस्त्यावरच होता. त्यानंतर गर्दी चांगलीच वाढली. लागलीच वाघोबाने जंगलाचा आडोसा घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
या तीन गावांना धोका
चिकना, धामना आणि बुटीटोला ही तीन गावे उमरेड- करांडला-पवनी अभयारण्याला खेटून आहेत. अभयारण्याने वेढलेल्या या गावकऱ्यांना हिस्त्र स्वापदांचा चांगलाच त्रास होतो. यामुळे या तीनही गावाला चांगलाच धोका संभवतो. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान या परिसरात होत असते. यामुळे वनविभागाने योग्य पाऊल उचलण्याची मागणी चार वर्षांपासून होत आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शैलेश जुमडे, प्रकाश शिवरकर, गोलू मांढरे, भगवान शिवरकर, विठ्ठल मांढरे, सुनीता शिवरकर, कल्पना वाघमारे, निर्मला शिवरकर, सलमा रामटेके, माया कळंभे, अशोक शिवरकर आदींनी केली आहे.