वाहतूक कोंडीत अडकले, प्रवाशांचे विमान हुकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:49 PM2017-12-11T23:49:12+5:302017-12-11T23:53:32+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. याचा फटका विमानतळावर जाणाऱ्या व्हीआयपींनाही बसला. वाहतूक कोंडीत अडकल्याने १२ प्रवाशांना विमान मिळाले नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. याचा फटका विमानतळावर जाणाऱ्या व्हीआयपींनाही बसला. वाहतूक कोंडीत अडकल्याने १२ प्रवाशांना विमान मिळाले नाही, अशी माहिती पुढे आली आहे. ज्यांच्याकडे थोडा वेळ होता त्यांना सामानासह विमानतळावर धावपळ करावी लागली.
शहरातील रहदारीच्या घडामोडी प्रामुख्याने वर्धा मार्गावर घडतात. विमानतळावरून शहरात येण्यासाठी हा एकच मार्ग आहे. त्यातच मेट्रो रेल्वेच्या कामामुळे हा मार्ग ठिकठिकाणी अरुंद झाला आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधीत या मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु परिस्थिती नियंत्रणात राहणार असल्याचा दावा पोलीस करीत होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा दावा फोल ठरला. शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा रोडने जाणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला.
डॉ. बाबासाहेब आंंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य मार्गावर हॉटेल प्राईडसमोर सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चक्काजाम केला. थोड्याच वेळात या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यात यश आले नाही. त्यानंतर त्यांनी आऊ टर रिंगरोडने वाहतूक वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे ज्यांना वर्धेला जायचे होते वा नागपूर शहरात यावयाचे होते त्यांना कमालीचा त्रास झाला. असे असले तरी विमानतळावर जाण्यासाठी वर्धा मार्गाला पर्यायी रस्ता नसल्याने वाहतुकीची कोंडी झालीच.
सकाळी मुंबई, पुणे व दिल्लीकडे विमाने रवाना झाली. काही प्रवासी आंदोलनापूर्वी विमानतळावर पोहोचले होते. मात्र १२ प्रवासी वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांचे विमान हुकले. अनेक प्रवाशांना धावपळ केल्याने विमान मिळाले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.
पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केले. सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह जवानांना तैनात करण्यात आले होते. वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होताच आऊ टर रिंगरोड व मनीषनगर मार्गे वाहतूक वळविण्याचा प्रयत्न केला.
रवींद्र परदेशी
सहायक पोलीस आयुक्त वाहतूक