काबाडकष्टासाठी बिहारमधून अल्पवयीन मुलांची तस्करी; आरपीएफच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघड

By नरेश डोंगरे | Published: November 18, 2024 07:02 PM2024-11-18T19:02:23+5:302024-11-18T19:03:55+5:30

Nagpur : रेल्वे स्थानकावर आरोपीची मुलांवर जोरजबराई

Trafficking of minors from Bihar; The case came to light due to the alertness of the RPF | काबाडकष्टासाठी बिहारमधून अल्पवयीन मुलांची तस्करी; आरपीएफच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघड

Trafficking of minors from Bihar; The case came to light due to the alertness of the RPF

नरेश डोंगरे - नागपूर 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कबाडकष्टाचे काम करवून घेण्यासाठी ६ अल्पवयीनांसह ९ मुलांची बिहारमधून तस्करी करण्यात आल्याचे खळबळजनक प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून प्रमोद यादव आणि संजय यादव अशी त्यांची नावे आहेत.

आरपीएफच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपुरात खासगी कंपनीत काम आणि भरपूर पगार मिळत असल्याची बतावणी करून बिहारच्या भोजपूर आणि बक्सर जिल्ह्यातून ९ अल्पवयीन मुलांना नागपुरात आणण्यात आले. यातील ३ मुले १८ वयोगटातील आणि सहा मुले १२ ते १५ वयोगटातील आहेत. नागपुरात आणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कष्टाच्या कामावर जुंपण्यात आले. करवून घेतले जाणारे काम कठीण असल्याने आणि खाण्यापिण्याचे, राहण्याचेही वांदे असल्याने ही मुले काही दिवसातच रडकुंडीला आली. त्यांनी संधी साधून १४ नोव्हेंबरला गावाला पळून जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले. तिकिट काऊंटरजवळ आल्यानंतर त्यांची रडवेली स्थिती आणि संशयास्पद वर्तन रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकाने सीसीटीव्हीत टिपले. त्यांना एक व्यक्ती तेथून बाहेर नेण्यासाठी जोरजबराई करीत असल्याचेही सीसीटीव्हीत दिसत होते. ही माहिती आरपीएफच्या वरिष्ठांसह क्राईम प्रिव्हेंशन अँड डिटेक्शन स्क्वॉड (सीपीडीएस)ला कळविण्यात आली. त्यानुसार, आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त मनोजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मनोज पांडे, हवलदार विक्रमसिंग ठाकूर, कॉन्स्टेबल नीरजकुमार, दीपा कैथवास, विणा सोरेन आदींनी धावपळ करून लगेच त्या ९ मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या आरोपी प्रमोद यादव यालाही पकडण्यात आले.

प्राथमिक चाैकशीत मुलांनी आपले नाव, पत्ता सांगून आरोपी प्रमोद आणि संजय यादवने हलके फुलके काम आणि चांगले पैसे देण्याचे आमिष दाखवून बिहारमधून नागपुरात आणल्याचे आणि येथे त्यांच्याकडून जोरजबराईने ठिकठिकाणी अवजड कामे करवून घेत असल्याचेही सांगितले. त्यावरून आरपीएफने हे प्रकरण चाैकशीसाठी लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांना सोपविले. प्राथमिक चाैकशीनंतर ठाणेदार गाैरव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी प्रमोद यादवला बोलते करून त्याच्याकडून दुसरा आरोपी संजय यादवचा संपर्क क्रमांक मिळवून त्यालाही ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध मानवी तस्करीसोबतच बाल न्याय अधिनियम आणि बाल श्रम विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
मुलांची शासकीय आश्रयगृहात रवानगी

रेल्वे पोलिसांनी जिल्हा सुरक्षा अधिकारी तसेच चाईल्ड लाईनच्या मदतीने सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांना शासकीय आश्रयगृहात दाखल केले. या प्रकरणात अनेक आरोपी असण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Trafficking of minors from Bihar; The case came to light due to the alertness of the RPF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.