नागपुरात बारा वर्षीय शाळकरी मुलाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 08:20 PM2018-01-30T20:20:44+5:302018-01-30T20:21:55+5:30
वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. पीयूष श्रीकांत घोडे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजापेठ भागात राहत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. पीयूष श्रीकांत घोडे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजापेठ भागात राहत होता.
सोमवारी रात्री ७ च्या सुमारास पीयूष त्याच्या वस्तीत सायकल चालवित होता. त्याच्या घराजवळ टी पॉर्इंट आहे. तेथे एमएच ३१/ सीबी ६७९४ च्या चालकाने टाटा एस वाहन उभे केले. वाहनात मागेपर्यंत आलेले लोखंडी पत्रे (टिना) लादले होते. कोणतीही धोक्याची सूचना किंवा संकेत नव्हते किंवा वाहनचालकाने तेथे मागे उभे राहण्याचीही काळजी घेतली नाही. त्यामुळे काहीसा वेगात सायकलने आलेला पीयूष सायकलसह टिनावर आदळला. त्याचा गळा कापला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. तशाही अवस्थेत तो उठून उभा झाला आणि बाजूला असलेल्या घराच्या दिशेने पळत सुटला. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी आरडाओरड केली. बाजुलाच पीयूषचे वडील उभे होते. त्यांनी लगेच पीयूषला जवळ घेतले. त्याला गंभीर अवस्थेत डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच हुडकेश्वरचे सहायक निरीक्षक सावंत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पीयूषच्या मृत्यूला कारणीभूत असलेले वाहन ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.