भरधाव टिप्परने चिरडल्याने मुलाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:17+5:302021-08-21T04:13:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भरधाव टिप्परने चिरडल्याने एका मुलाचा करुण अंत झाला, तर त्याची वृद्ध आई या अपघातात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भरधाव टिप्परने चिरडल्याने एका मुलाचा करुण अंत झाला, तर त्याची वृद्ध आई या अपघातात गंभीर जखमी झाली. कामठी मार्गावरील शारदा कंपनी चाैकाजवळ गुरुवारी दुपारी ४.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भूपेंद्र ऊर्फ बबलू श्रीराम कराडे (वय ४०) असे मृताचे, तर रेशमाबाई कराडे असे त्याच्या जखमी आईचे नाव आहे.
भूपेंद्र हा यशोधरानगरातील संजीवनी क्वार्टरमध्ये राहत होता. तो अमरावतीच्या तक्षशिला कॉलेजमध्ये लिपिक म्हणून नोकरीला होता. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास भूपेंद्र हा त्याची आई रेशमाबाई यांच्या मूळ गावी कोची येथे गेला होता. ते दुचाकीने परत येताना दुपारी ४.३० च्या सुमारास शारदा चौकाजवळ खड्डयामुळे त्याच्या दुचाकीचे संतुलन बिघडले. त्यामुळे तो आणि त्याची आई दुचाकीवरून रस्त्यावर पडले. तेवढ्यात वेगात आलेल्या एमएच ४० - सीडी ३२०१ क्रमांकाच्या टिप्परने या माय-लेकाला चिरडले. त्यामुळे माय-लेक गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी भूपेंद्रला मृत घोषित केले, तर रेशमाबाई यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोजराज कराडे यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी टिप्परचालक किशोर जेठालाल (वय ३५, रा. छिंदवाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
----
गावाला जाण्यास पत्नी करायची विरोध
भूपेंद्र घरातील कर्ता अन् कमावता होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कराडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भूपेंद्र वारंवार मूळ गावी जायचा. पण त्याला त्याची पत्नी दीपाली नेहमी विरोध करत होती. गुरुवारी सकाळीसुद्धा तिने भूपेंद्रला गावाला जायला विरोध केला होता. मात्र, तो झुगारून भूपेंद्र गावाला गेला अन् परत न येता कायमचाच निघून गेला. भूपेंद्रला दोन मुली असल्याचे समजते.
----