नागपुरात पहिल्या माळ्यावरून पडून चिमुकल्याचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:39 PM2020-07-23T21:39:36+5:302020-07-23T21:41:44+5:30
पहिल्या माळ्यावरील खिडकीतून पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेषनगरात गुरुवारी दुपारी ही करुणाजनक घटना घडली. मन्वय देवेंद्र पौनीकर असे मृत बालकाचे नाव असून तो दीड वर्षाचा होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहिल्या माळ्यावरील खिडकीतून पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेषनगरात गुरुवारी दुपारी ही करुणाजनक घटना घडली. मन्वय देवेंद्र पौनीकर असे मृत बालकाचे नाव असून तो दीड वर्षाचा होता.
देवेंद्र पौनीकर त्यांच्या वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुलांसह शेषनगरातील घरात राहतात. घराचे काम निर्माणाधीन आहे. त्यामुळे ते पहिल्या माळ्यावर राहतात. ते एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे देवेंद्र गुरुवारी सकाळी त्यांच्या कामावर निघून गेले. त्यानंतर घरकाम आटोपून सकाळी ११ च्या सुमारास त्यांची पत्नी मेडिकल स्टोअर्समध्ये गेली. देवेंद्र यांची आई दोन नातवांसह घरी होत्या. आठ वर्षाचा मोठा आणि चिमुकला मन्वय खिडकीजवळ खेळत होते. घराच्या जमिनी (टाईल्स)पासून अवघ्या दीड फूट अंतरावर असलेल्या खिडकीला ग्रील नाही. स्टीलच्या चौकटीवर स्लाइडिंग डोअर लावण्यात आली आहे. खेळता-खेळता त्यातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करणारा चिमुकला मन्वय खाली पडला. तो गंभीर जखमी झाला. ते लक्षात येताच देवेंद्र यांच्या आईने आरडाओरड केला. त्यामुळे बाजूची मंडळी धावली. शेजाऱ्यांनी त्याला बाजूच्या इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नंदनवन पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
खिडकीला ग्रील नसल्यामुळे ही घटना घडली. चिमुकला नातू खाली पडून मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची आजी बेशुद्ध पडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.