मामाच्या लग्नाला निघालेल्या चिमुकल्याचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:10 AM2021-02-16T04:10:52+5:302021-02-16T04:10:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेव्हण्याच्या लग्नाला पत्नी आणि चिमुकल्यासह निघालेल्या एका तरुणाच्या दुचाकीला भरधाव टिप्पर चालकाने जोरदार धडक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेव्हण्याच्या लग्नाला पत्नी आणि चिमुकल्यासह निघालेल्या एका तरुणाच्या दुचाकीला भरधाव टिप्पर चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील पाच वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला, तर त्याचे आईवडील गंभीर जखमी झाले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिडगाव येथे सोमवारी दुपारी ११.४५च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर १२ मध्ये राहणारे प्रफुल्ल शेंडे यांच्या मेव्हण्याचे सोमवारी लग्न होते. त्यामुळे प्रफुल्ल त्याची पत्नी आणि पाच वर्षीय चिमुकला देवांशला घेऊन दोन दिवसांपासून सासुरवाडीत होते. त्यांचे सासरे महिपतराव रामाजी उमाठे (वय ५८) बिडगावांत राहतात. तेथे रविवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला. आज सोमवारी सकाळपासून लगीनघाई सुरू झाली. आपापल्या वाहनाने नातेवाईक लग्न समारंभ स्थळाकडे निघाले. प्रफुल्ल पत्नी मोना आणि चिमुकल्या देवांशला सोबत घेऊन ११.३०च्या सुमारास पल्सरने पारडी-भांडेवाडीकडे निघाला. वाठोड्यातील बिडगावच्या एका ट्रेडर्ससमोर आले असताना, मागून येणाऱ्या एका टिप्पर (एमएच ४०-बीजी ७७७०)च्या चालकाने प्रफुल्लच्या दुचाकीला धडक मारली. त्यामुळे तिघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता, चिमुकल्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रफुल्ल आणि मोना गंभीर जखमी आहेत.
---चिमुकला अनेकांना रडवून गेला
अपघाताचे वृत्त लग्न समारंभस्थानी पोहोचल्याने तेथे तीव्र शोककळा पसरली. वराकडील मंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेतली. चिमुकला देवांश जाताना त्याच्या आईवडीलच नव्हे, तर अनेकांना रडवून गेला. दरम्यान, उमाठे यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी टिप्पर चालक संतोष मोरघडे याला अटक केली.
---