नाल्यातील खड्ड्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:27+5:302021-06-16T04:11:27+5:30
मनोज झाडे हिंगणा : वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. आरुषी नामदेव राऊत ...
मनोज झाडे
हिंगणा : वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. आरुषी नामदेव राऊत (११) व अभिषेक नामदेव राऊत (९) अशी मृत मुलांची नावे आहे. हिंगणा तालुक्यातील (जि.नागपूर) येथे दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी वीटभट्टी चालक सुरेश मलिये व स्वदीप मलिये (रा. सावंगी देवळी) यांच्यावर भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुुपारी या दोन्ही मुलांचे मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
एमआयडीसीच्या इंदिरामातानगर येथील राज पांडे या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना तालुक्यात दोन मुले बेपत्ता असल्याचे वृत्त कळताच पोलीस यंत्रणेची सोमवारी सकाळी तारांबळ उडाली होती.
रविवारी (दि.१३) दुपारनंतर ३ वाजता आरुषी आणि अभिषेक खेळण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांची आई कामावर गेली होती, तर वडील बाहेर होते. सायंकाळी मुलांची आई पुष्पा कामावरून परत आल्यानंतर मुले घरी नव्हती. तिने आजूबाजूला शोध घेतला मात्र मुले आढळली नाही. रात्री उशिरापर्यंत त्यांनी मुलाचा शोध घेतला. मात्र, कुठेही पत्ता लागली नाही. सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने राऊत कुटुंबीयांनी शोधकार्य सुरू केले. गावालगतच्या नाल्यात दोन्ही मुलांचे कपडे व चप्पल दिसताच ग्रामस्थांनी तातडीने हिंगणा पोलिसांना याबाबत अवगत केले.
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिण दुर्गे यांच्या सूचनेनंतर पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे पोलीस ताफ्यासह सावंगी देवळी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दाखल झाले. पोलिसांनी पाणी भरलेल्या मोठ्या खड्ड्यात ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र, या खड्ड्यात १५ ते २० फूट पाणी व गाळ असल्यामुळे कोणीही आत उतरायला तयार नव्हते. शेवटी अग्निशमन दलाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दल वेळेत पोहोचले नसल्याने गावातील काही युवक खड्ड्यात उतरले. येथे गाळात मुलांचे मृतदेह असल्याचे त्यांना खात्री पटली. मात्र, गाळात कुणी उतरण्यात तयार नसल्याने जेसीबी बोलावून खड्ड्यासमोरील बांध तोडून पाणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी ११.५८ वाजेदरम्यान मोहन पारसे, गंगाधर नगरे या युवकाने आरुषीचा तर १२.२० वाजतादरम्यान अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.
===Photopath===
140621\20210614_122418.jpg
===Caption===
घटनाष्टलावरील गर्दी