ट्रायने १०० फ्री चॅनल विनामूल्य करावे : ग्राहक पंचायतची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:05 PM2019-01-11T22:05:36+5:302019-01-11T22:07:42+5:30
१०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.
फ्री चॅनलमध्ये बरेचसे चॅनल ग्राहक बघणारच नाहीतच. त्यानंतरही ट्रायने १३० रुपये मासिक शुल्क आणि त्यावर १८ टक्के अर्थात २३.४० रुपये आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना बेसिक शुल्काच्या नावाखाली १५४ रुपये अनावश्यक भरावे लागणार आहे. म्हणजेच प्रत्येक चॅनलला १.५४ रुपये पडणार आहे. मग हे फ्री चॅनल कसे, असा सवाल पांडे यांनी उपस्थित केला. पूर्वी झी, सोनी, स्टार ग्रूप, कलर्स आणि अन्य ग्रुपच्या पॅकेजचे दर ठरलेले होते. त्या सर्व ग्रुपचे दर ग्राहकांच्या इच्छेविना तसेच बरेच चॅनल ग्राहक पाहत नसतांनासुद्धा ग्राहकांवर अनावश्यक लादले जात होते. यापासून ट्रायने ग्राहकांची सुटका केली आहे. ग्राहकांना सध्या जे चॅनल आवडतात ते सर्व पेड झाले आहे. परंतु ग्राहकांच्या आवडीचे चॅनलचे दर हे १९ रुपयांपर्यंत वाढविले आहेत. हा ग्राहकांवर अन्याय आहे.
टीव्ही मनोरंजनाचे साधन झाले तरीही ती आवश्यक सेवा झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरून कुठल्यातरी मोठ्या कंपन्यांचा फायदा करण्याच्या दृष्टीने ट्रायने दरवाढीचे पाऊल उचलल्याची शंका पंचायतने व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हस्तक्षेप करुन १ फेब्रुवारी २०१९ पासून होणाऱ्या टीव्ही केबल शुल्क दरवाढीला स्थगिती द्यावी आणि १०० फ्री चॅनल कुठलेही शुल्क न आकारता पूर्णपणे विनामूल्य करावे आणि सर्व पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे सचिव संजय धर्माधिकारी, उपाध्यक्ष डॉ. नारायण मेहेरे, सुधीर मिसार, डॉ. अजय गाडे, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, शहर अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते यांनी केली आहे.