रेल्वे प्रशासन सज्ज
By admin | Published: September 29, 2014 01:02 AM2014-09-29T01:02:33+5:302014-09-29T01:02:33+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध बांधवांची कुठलीही गैरसोय होऊ नये आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी अधिकाऱ्यांना योग्य
कडेकोट बंदोबस्त : भाविकांना पुरविणार सोयी-सुविधा
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध बांधवांची कुठलीही गैरसोय होऊ नये आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष कार्य समितीचे गठन केले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारो बौद्ध बांधव पवित्र दीक्षाभूमीवर येतात. त्यामुळे अजनी आणि नागपूर रेल्वेस्थानकावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नजर ठेवून राहणार आहेत. विभागातील सर्व रेल्वेस्थानकावर प्रथमोपचाराची व्यवस्था करून तेथे वैद्यकीय अधिकारी तैनात ठेवण्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय नागपूर रेल्वेस्थानक आणि अजनीमध्ये अतिरिक्त आरक्षण खिडक्या उघडण्यात येऊन प्रवाशांना ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत. जनरल कोचमधील प्रवाशांनी आरक्षित डब्यात चढू नये यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
याशिवाय स्वच्छतेसाठी अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच श्वानपथकाच्या साह्याने जागोजागी तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त विद्युत व्यवस्था तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी सहायता कक्ष उभारण्यात येणार आहे. प्रवाशांनी छतावर तसेच पायदानावर प्रवास करू नये आणि रेल्वे परिसर स्वच्छ राखण्यास मदत करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)