१५ मिनिटात होणार रेल्वेगाड्या चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:44 AM2018-08-26T01:44:17+5:302018-08-26T01:45:44+5:30
प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थानकावर १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांची अत्याधुनिक मशीनद्वारे सफाई करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थानकावर १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांची अत्याधुनिक मशीनद्वारे सफाई करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेनुसार नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची अत्याधुनिक मशीनने स्वच्छता करण्यात येईल. ज्या रेल्वेगाड्यांचा थांबा १५ मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक काळ आहे अशा चारही दिशांना ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची यात सफाई करण्यात येईल. सफाईसाठी हाय प्रेशर जेट मशीनद्वारे टॉयलेटची सफाई, कम्पार्टमेंटची सफाई, कोचच्या फ्लोअरची सफाई करण्यात येईल. आरक्षित कोचमध्ये ठेवण्यात आलेल्या डस्टबिनमधील कचऱ्याची विल्हेवाटही लावण्यात येणार आहे. याशिवाय वातानुकूलित कोचच्या बाहेरील ग्लासची सफाई करण्यात येईल. आरक्षित कोचमधील प्रवाशांच्या सफाईबाबतच्या तक्रारींचा त्वरित निपटारा या योजनेत करण्यात येणार आहे. योजनेच्या शुभारंभप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.