बॉम्बची सूचना मिळाल्याने नागपुरात रेल्वेगाड्यांची कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 08:49 PM2019-09-02T20:49:28+5:302019-09-02T20:50:15+5:30
देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची माहिती आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची श्वानपथकासह कसून तपासणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची माहिती आहे. त्यामुळे या एजन्सीने देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची श्वानपथकासह कसून तपासणी करण्यात येत आहे.
नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १२५ ते १४० रेल्वेगाड्या तसेच ४० ते ४५ हजार प्रवाशी ये-जा करतात. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला देशात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची सूचना मिळाली आहे. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची तपासणी सुरू केली आहे. रेल्वेगाडी आली की रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. श्वानपथकाच्या मदतीने संशय आलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी रात्रीही रेल्वे सुरक्षा दलाने जवळपास २० रेल्वेगाड्यांची तपासणी केली. सोमवारी दिवसा आणि रात्री तपासणी सुरूच होती. लोहमार्ग पोलिसांकडूनही रेल्वेगाड्यांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या साह्याने संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही तपासणी सुरूच राहणार असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सीसीटीव्हीद्वारे रेल्वेस्थानकावर ‘वॉच’
नागपूर रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कक्षातील आरपीएफ जवानांनाही रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालीची बारकाईने पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वेगाड्यात पेट्रोलिंग वाढविली
‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वेगाड्यात लोहमार्ग पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या साह्याने संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे.’
विश्व पानसरे, लोहमार्ग पोलीस अधीक्षक