रेल्वे प्रवास ठरला जीवनाचा अंतिम प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:09 AM2021-08-15T04:09:04+5:302021-08-15T04:09:04+5:30
नागपूर : भावासोबत कानपूरला जात असलेल्या २० वर्षाच्या युवकाची प्रकृती बिघडून त्याचा रेल्वेगाडीतच मृत्यू झाला. ही घटना नागपूर रेल्वेस्थानक ...
नागपूर : भावासोबत कानपूरला जात असलेल्या २० वर्षाच्या युवकाची प्रकृती बिघडून त्याचा रेल्वेगाडीतच मृत्यू झाला. ही घटना नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी घडली असून, रेल्वेतील प्रवास या युवकाच्या जीवनाचा अंतिम प्रवास ठरला.
पंकजकुमार अमरनाथ सरोज (२०) रा. अलाहाबाद हा पाच दिवसापूर्वी खाली पडून जखमी झाला होता. दरम्यान, तो आपला भाऊ अरुणकुमार सरोज याच्यासोबत रेल्वेगाडी क्रमांक ०२५२२ एर्नाकुलम-बरौनी स्पेशल रेल्वेगाडीच्या कोच एस १, बर्थ १ वरून तिरुपूर येथून कानपूरला जात होता. प्रवासात त्याची प्रकृती बिघडली. दरम्यान, गाडीतील टीटीईने याची माहिती नागपूरच्या उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. उपस्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. परंतु ही गाडी नागपूरला पोहोचण्यापुर्वीच काळाने पंकजकुमारला गाठले. प्रवासातच त्याचे निधन झाले. ही गाडी दुपारी ४.५० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर आली. पंकजकुमारचा मृतदेह गाडीखाली उतरविण्यात आला. दरम्यान, रेल्वे डॉक्टर मनोज जांगीड यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला असून, तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र फुसाटे करीत आहेत.
...............