नागपूरहून निघालेली भाजपा कार्यकर्त्यांची ट्रेन गुजरातमार्गे मुंबईत; समारोपाला हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:40 PM2018-04-06T14:40:57+5:302018-04-06T14:41:19+5:30
भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी दीड हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून विशेष रेल्वे निघाली. मात्र, ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी दीड हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून विशेष रेल्वे निघाली. मात्र, ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आली. या विलंबामुळे ही रेल्वे दुपारी २ वाजताच्या सुमा
रास बांद्रा येथे पोहोचली. तेथून नेते व कार्यकर्त्यांना बेस्टच्या बसद्वारे बांद्रा कुर्ला येथील कार्यक्रमस्थळी पोहचविण्यात आले. मात्र, तोवर मेळावा समारोपाला आला होता. यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
नागपूरहून गुरुवारी दुपारी ३.२४ वाजता ही विशेष रेल्वे सुटली. १९ डब्याची ही रेल्वे कार्यकर्त्यांनी फुल्ल होती. सुमारे १५०० ते १८०० पदाधिकारी व कार्यकर्ते या गाडीत होते. भाजपाचे आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी महापौर प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, डॉ. किर्तीदा अजमेरा, संदीप जाधव, श्रीकांत देशपांडे यांच्यासह बहुतांश नगरसेवक, नगरसेविका व त्यांचे पतीही या गाडीत होते. नागपूरहून मुंबईला पोहचण्यासाठी साधारणत: १४ ते १५ तास लागतात. त्यामुळे ही गाडी सकाळी ७ पर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पदाधिकारी व कार्यकर्ते तशा चर्चांमध्ये रंगले होते. मात्र, ही गाडी गुजरातमार्गे वळविण्यात आल्याचे पहाटे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. मनमाडवरून नंदूरबार मार्गे ही गाडी वळविण्यात आली असून ती आता सूरत, वलसाड मार्गे मुंबईला पोहचेल, अशी माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा भडका उडाला. सकाळी ९.५० वाजता गाडी वलसाड येथे पोहचली. येथे भाजप नेत्यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. नियमित गाड्यांसाठी रेल्वे रूट व्यस्त असल्यामुळे गुजरातमार्गे ही विशेष गाडी वळविण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नागपुरातून सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसाठी गुरुवारी विशेष रेल्वेगाडी ‘बुक’ करण्यात आली होती. रेल्वेतर्फे तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र भाजपतर्फे कार्यकर्त्यांना सकाळी १० ची वेळ सांगण्यात आली. फक्त कार्यकर्ते घेऊन विशेष रेल्वेगाडी ८.१५ वाजता नागपूरहून रवाना झाली. भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क करुन हा गोंधळ कळविला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती नागपुरात बोलविली. ही दुपारी ३.२४ वाजता गाडी मुंबईकडे रवाना झाली होती. एवढे सर्व होऊनही गाडी गुजरातला वळविल्याने कार्यकर्त्यांना मुंबईत पोहचायला ८ ते ९ तासांचा विलंब झाला. यामुळे मेळाव्याच्या शुभारंभाला पोहचण्याच्या आशेने निघालेले कार्यकर्ते समारोपालाच पोहचले.
रेल्वेने हेतूपूरस्सर रेल्वे वळवली : भाजपाचा आरोप
गुरुवारी दुपारी मुंबईसाठी निघालेली विशेष रेल्वेगाडी कारण नसताना गुजरातच्या ट्रॅकशी जोडण्यात आली. ही गाडी सकाळी ९.५० वाजता वलसाड येथे पोहोचली. रेल्वेचे अधिकारी लालफितशाहीच्या मानसिकतेतून अद्याप बाहेर आलेली नाही. भाजपाचे कार्यकर्ते वेळेवर मुंबईत पोहचू नये या उद्देशाने रेल्वेने हेतूपूरस्सर ही रेल्वे गुजरातला वळविल्याचा आरोप भाजापाचे प्रसिद्ध प्रमुख चंदन गोस्वामी यांनी केला.