रेल्वे स्थानकावरील बॅग स्कॅनर पुन्हा बंद
By Admin | Published: July 13, 2016 03:30 AM2016-07-13T03:30:25+5:302016-07-13T03:30:25+5:30
आठ दिवसांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील भागात असलेले बॅग स्कॅनर बंद पडल्यामुळे जवळपास
सुरक्षा ऐरणीवर : विना तपासणी सामान जातेय रेल्वेगाड्यात
नागपूर : आठ दिवसांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील भागात असलेले बॅग स्कॅनर बंद पडल्यामुळे जवळपास चार दिवस प्रवाशांच्या बॅग तपासणीविना आत जात होत्या. दरम्यान, बॅग स्कॅनरची दुरुस्ती करून ते सुरू करण्यात आले. परंतु सोमवारी दुपारपासून पुन्हा हे बॅग स्कॅनर बंद पडल्यामुळे प्रवासी त्यांच्या बॅग, साहित्याची तपासणी न करताच आत शिरताना दिसले.
नागपूर रेल्वे स्थानकावर पूर्व आणि पश्चिमेकडील भागात एक असे दोन बॅग स्कॅनर आहेत. आठ दिवसांपूर्वी पश्चिमेकडील बॅग स्कॅनरचा बेल्ट तुटल्यामुळे हे बॅग स्कॅनर बंद पडले होते. चार दिवस उलटूनही हे बॅग स्कॅनर दुरुस्त करण्यात आलेले नव्हते.
यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून या गंभीर बाबीकडे रेल्वे सुरक्षा दलाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर हे बॅग स्कॅनर दुरुस्त करण्यात आले. परंतु या घटनेचा पाच दिवसांचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा पश्चिमेकडील भागात असलेले बॅग स्कॅनर सोमवारी दुपारपासून बंद पडले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत प्रवासी त्यांच्या बॅग, सामानाची तपासणी न करताच रेल्वे स्थानकात शिरताना दिसले. नागपूर रेल्वे स्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
देशात कुठेही अप्रिय घटना घडल्यास नागपूर रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात येतो. परंतु तरीसुद्धा बॅग स्कॅनर बंद पडल्यानंतर ते त्वरित दुरुस्त करण्याची यंत्रणा रेल्वे सुरक्षा दलाकडे नाही.
त्यामुळे वारंवार बंद पडणाऱ्या बॅग स्कॅनरबाबत कडक उपाययोजना करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)