मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 01:16 PM2022-07-16T13:16:52+5:302022-07-16T13:24:15+5:30

तीन रेल्वे गाड्या रद्द, नऊ गाड्यांना विलंब तर दोन गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या.

Train service in Itarsi route disrupted due to drift of ballast in railway line, three trains canceled, nine trains delayed | मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

Next

नागपूर : सर्वत्र सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेसेवेत व्यत्यय निर्माण झाला आहे. अशात नागपूर इटारसी रेल्वे सेक्शनमधील किरतगड-केसला स्थानकादरम्यान रेल्वेलाईनमधील गिट्टी वाहून गेली. त्यामुळे डाऊन लाईनवरच्या (इटारसी मार्ग) रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. धोका लक्षात घेता या मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्या दुसऱ्या मार्गावर वळवल्या. तीन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर ९ रेल्वेगाड्या आहे तेथेच थांबविण्यात आल्याने त्या विलंबाने धावणार आहेत.

चार दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक रेल्वेगाड्या मंदगतीने धावत आहेत. अशात किरतगड- केसला रेल्वेस्थानका दरम्यानच्या पटरीची गिट्टी पावसामुळे वाहू लागली. शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास हा प्रकार सुरू झाला. तो लगेच लक्षात न आल्याने या मार्गावर पहाटे ४ वाजेपर्यंत रेल्वे धावत होत्या. नंतर मात्र धोका वाढल्याचे लक्षात आल्याने डाऊन लाईनवरील रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या.

रेल्वे प्रशासनाने लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुसरीकडे ट्रेन क्रमांक २०८०६ नवी दिल्ली - विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १२६२६ नवी दिल्ली त्रिवेंद्रम केरला एक्स्प्रेसचा मार्ग बदलवून ती खंडवा, बडनेरा, वर्धा, बल्लारपूर मार्गाने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर नागपूर - आमला, आमला - नागपूर आणि आमला इटारसी या तीन पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्या. गिट्टी वाहून गेल्याने रेल्वेलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे, डाऊन लाईनवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने ट्रेन क्रमांक १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेस, १२७९२ सिकंदराबाद एक्स्प्रेस, १६०९४ लखनऊ चेन्नई एक्स्प्रेस आणि २२६९२ बंगळुरू राजधानी एक्स्प्रेस या गाड्या किरतगडजवळ थांबविण्यात आल्या.

काही वेळेनंतर अप लाईनवरून या तीन गाड्यांना एक एक करून पुढे सोडण्यात आले. मात्र, नागपूर इटारसी रेल्वेसेक्शनमधील ट्रेन क्रमांक १२७९१ सिकंदराबाद एक्स्प्रेस, १२६४९ संपर्कक्रांती एक्स्प्रेस, १६०३१ अंदमान एक्स्प्रेस, २०८४५ बिलासपूर -बिकानेर एक्स्प्रेस आणि १२८०७ समता एक्स्प्रेस जागो जागी काही वेळेसाठी अडकून पडली. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

पहाटेपासून रेल्वेलाईन दुुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धस्तरावर सुरू केले. त्यामुळे दुपारी १२.२६ वाजता डाऊन लाईनवरील वाहतूक सुरळीत होऊ शकली. त्यानंतर पहिली रेल्वेगाडी १२७९२ सिकंदराबाद एक्स्प्रेस या मार्गावरून धावू लागली.

Web Title: Train service in Itarsi route disrupted due to drift of ballast in railway line, three trains canceled, nine trains delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.