रेल्वे ट्रॅकमेन होणार आता अधिक सुरक्षित : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:03 AM2019-12-29T00:03:49+5:302019-12-29T00:05:27+5:30

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्यामुळे ट्रॅकवर फिरणाऱ्या ट्रॅकमनला येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि ते धोकादायक स्थितीपासून सहज दूर जाऊ शकतील.

Train trackmen will now be safer | रेल्वे ट्रॅकमेन होणार आता अधिक सुरक्षित : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

रेल्वे ट्रॅकमेन होणार आता अधिक सुरक्षित : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

Next
ठळक मुद्दे आमूलाग्र बदल घडण्याचा विश्वास

निशांत वानखेडे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या किंवा रेल्वेच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (ट्रॅकमेन) कायम धोक्यात वावरावे लागते. जराही नजर चुकली तर अपघातात प्राणहानी होण्याची शक्यता निश्चितच असते. त्यामुळे सुरक्षेसाठी सावधानता बाळगणे नितांत गरजेचे असते. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रॅकमनची सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे. होय, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्यामुळे ट्रॅकवर फिरणाऱ्या ट्रॅकमनला येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि ते धोकादायक स्थितीपासून सहज दूर जाऊ शकतील.
रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले असून संशोधनाला ‘ट्रॅकमेन अलर्ट सिस्टीम’ हे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकमेनच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करीत प्रकल्प स्वीकारले होते. हा प्रकल्प दोन भागात विभागण्यात आला. यामध्ये एक उपकरण रुळावर फिरणाऱ्या ट्रॅकमनला अलर्ट करेल तर दुसरे रेल्वे फाटकाजवळ येणाऱ्या गाडीचे व इतर वाहनांचे मॉनिटरींग करेल. याअंतर्गत माचिसच्या आकाराचे एक उपकरण तयार करण्यात आले जे ट्रॅकमनला अलर्ट करून धोक्याची सुचना देईल. आयओटी तंत्रज्ञान व वायरलेस सिस्टीमचा वापर करून तयार केलेले हे उपकरण हाताळण्यास अतिशय सोपे असून ट्रॅकमेनचे अपघात थांबविण्यात प्रभावी भूमिका बजावेल. या प्रकल्पात सिद्धेश जगताप,अमेय दहिकर, विनय केवटे आणि आदित्य चिकटे यांचा सहभाग राहिला. हे अभिनव तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी अवघ्या ३३३३ रुपये किमतीत विकसित केले असून नागपूरातील डायमंड क्रॉसिंगजवळ या तंत्रज्ञानाची यशस्वीपणे चाचणीही करण्यात आली.
दुसरे संशोधन ‘टीव्हीयु सेन्सस सिस्टीम’ या नावाने तयार केले असून लेव्हल क्रॉसिंग फाटकाजवळील वाहनांची अचूक मोजदाद यामुळे शक्य होणार आहे. ही यंत्रणा देखील नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक क्रमांक १२० येथे चाचणीत यशस्वी झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदेश खांडेकर, आदेश सिंगलवार, ऋषभ मिश्रा आणि नीरव जैन यांचा समावेश होता. दोन्ही संशोधन प्रकल्प इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा भालचंद्र हरदास आणि प्रा विशाल राठी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन रेल्वे विभागीय प्रबंधक निर्मलकुमार भंडारी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले.

मध्य रेल्वेला केले हस्तांतरित
हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले तर ट्रॅकमेनच्या सुरक्षेत आमूलाग्र बदल घडणार आहे. ही गरज लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प नुकतेच मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात आले. या अभिनव संशोधनासाठी नुकतेच नागपूर दौऱ्यावर आलेले मध्य रेल्वे, मुंबईचे महाप्रबंधक यांच्याहस्ते विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचा सत्कार केला. यावेळी मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय प्रबंधक सोमेश कुमार , अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक जयसिंह , ज्येष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी अरविंद दाभाडे यांचेसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे व्यवस्थापन तसेच प्राचार्य डॉ राजेश पांडे ,विभागप्रमुख डॉ खुर्शीद व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पाच वर्षात ७६८ ट्रॅकमनचा अपघात
ट्रॅकवर काम करताना अथवा पेट्रोलिंग करताना अवजड उपकरणे घेऊन हे कर्मचारी सतत फिरत असतात. अशावेळी रेल्वेचा मुख्य कणा असलेले हे कर्मचारी सतत तणावात असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने कधी कधी अपघात घडतात आणि त्यांना प्राणही गमवावे लागतात. रेल्वेच्या माहितीनुसार वर्ष २०१२ ते २०१७ दरम्यान ट्रॅकवर काम करणाऱ्या७६८ कर्मचाऱ्यांना अपघात झाला होता. अशावेळी हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यास या ट्रॅकमनची सुरक्षा अधिक सक्षम होईल, असा विश्वास संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Train trackmen will now be safer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.