आता 'त्या' प्रशिक्षणार्थी महिला पायलटला १५ दिवस विमान उडवता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:12 AM2023-11-23T11:12:41+5:302023-11-23T11:16:17+5:30
मिहान परिसरात विमान उतरविल्याच्या घटनेची चौकशी होणार
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियमित धावपट्टीऐवजी मिहान परिसरातील 'टॅक्सी वे'वर विमान उतरविणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला पायलटला आता १५ दिवस विमान उडवता येणार नाही. नागरी उड्डयण महासंचालनालयाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
महासंचालनालयाचे वायू सुरक्षा पथक घटनेची चौकशी करणार आहे. दरम्यान, एयर ट्रॅफिक कंट्रोलरचा संपर्क, प्रशिक्षणातील त्रुटी इत्यादी मुद्यांसंदर्भात संबंधित महिला पायलटची सखोल विचारपूस केली जाईल. त्यानंतर आवश्यक निर्देश दिले जातील. ही महिला पायलट गोंदियातील इंदिरा गांधी उड्डाण अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. तिने छोट्या प्रशिक्षण विमानामधून मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास गोंदियातील बिरसी विमानतळावरून नागपूर विमानतळाकडे उड्डाण भरले होते. दरम्यान, त्या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरसोबत संपर्क तुटला. त्यामुळे महिला पायलटने दुपारी १ च्या सुमारास 'टॅक्सी वे'वर विमान उतरविले. हे लॅण्डिंग अत्यंत धोकादायक होते. त्यामुळे विमानतळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
विमानतळाला मिहानसाेबत जोडण्यासाठी 'टॅक्सी वे' तयार करण्यात आला आहे. परंतु, 'टॅक्सी वे'चा अद्याप नियमित उपयोग केला जात नाही. परिणामी, या परिसरात मोकाट जनावरे फिरत असतात. संबंधित विमान उतरविण्यात आले त्यावेळी 'टॅक्सी वे'वर जनावरे नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.