जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षण; राज्यभरासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास
By गणेश हुड | Published: April 30, 2024 07:32 PM2024-04-30T19:32:45+5:302024-04-30T19:33:08+5:30
नवनियुक्त शिक्षकांना ३० दिवसांचे प्रशिक्षण देणारा नागपूर हा एकमेवर जिल्हा ठरला असल्याने राज्यभरासाठी मार्गदर्शक ठरला आहे
गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: जिल्हा परिषदेच्या शाळांवरील नवनियुक्त ३४५ शिक्षकांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत सुरु असलेल्या या प्रशिक्षणाचा मंगळवारी समारोप झाला. नवनियुक्त शिक्षकांना ३० दिवसांचे प्रशिक्षण देणारा नागपूर हा एकमेवर जिल्हा ठरला असल्याने राज्यभरासाठी मार्गदर्शक ठरला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या हर्षलता बुराडे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी निखिल भुयार सर, सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्य पुष्पा अनंत नारायण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
तरूण शिक्षकांच्या अंगी असलेला उत्साह हा नक्कीच जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातली उंची वाढवणारा असेल, सर्वांच्या सोबतीने अज्ञानाच्या शत्रूला हरवून ज्ञानाचा दिव्य प्रकाश जिल्हयात पसरवू असा विश्वास सौम्या शर्मा यावेळी व्यक्त केला. आपली भूमिका शिक्षकाची नाही तर सुलभकाची आहे, आणि शिक्षक प्रशिक्षण हा शिक्षण प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे,नवनियुक्त शिक्षक जिल्ह्यातल्या शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावतील असा आशावाद हर्षलता बुराडे यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षणादरम्यान जिल्ह्यातील स्थितीचा आढावा लक्षात घेऊन नवनियुक्त शिक्षकांची तयारी करून घेण्यात आली. नागपूर जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली. प्रशिक्षणाचे नियोजन हे प्रशिक्षण घेतलेल्या नवनियुक्त शिक्षकांमार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील, माधुरी झडे, विक्रम आकरे, रोमा शहा, उज्वला घुगे व संदीप यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन खुशबू मसराम यांनी मानले.