रूळ रिकामे असल्यामुळे लवकर पोहोचताहेत रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 09:32 PM2020-11-09T21:32:34+5:302020-11-09T21:35:35+5:30
Railway, Trains arrive early
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली आहे. नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. यामुळे रेल्वेगाड्या वेळेनुसार धावत आहेत. रेल्वे रूळ रिकामे असल्यामुळे रेल्वेगाड्या वेळेपुर्वी पोहोचत आहेत. यामुळे प्रवाशांना रेल्वेगाडीची वाट पाहण्याची गरज नाही. यापूर्वी प्रवाशांना उशिराने रेल्वेगाड्या येत असल्यामुळे प्लॅटफाॅर्मवर बसून राहावे लागत होते.
नागपूर रेल्वेस्थानकावरून मार्च महिन्यापर्यंत दररोज २०० प्रवासी आणि मालगाड्या धावत होत्या. नागपूर-इटारसी, नागपूर-वर्धा, नागपूर-गोंदिया मार्गावर दुप्पट क्षमतेने रेल्वेगाड्यांचे संचालन करण्यात येत होते. रेल्वे रुळावर मालगाड्याही धावत असल्यामुळे प्रवासी गाड्यांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वेगाड्यांना आऊटरवर उभे करण्यात येत होते. तर उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांनाही ताटकळत बसून राहावे लागत होते. सणासुदीच्या दिवसात स्पेशल रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेगाड्या उशिराने येण्याचे प्रमाण अधिक राहत होते. परंतु आता रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वे रूळ रिकामे आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्या वेळेनुसार धावत आहेत. हैदराबाद-तेलंगाणा एक्स्प्रेस ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर ९.३५ वाजता येते. परंतु आता ही गाडी ९.१० वाजता येत आहे. जबलपूर-नागपूर एक्स्प्रेस ६.३० वाजता येते. परंतु ही गाडी सुद्धा ५.४५ वाजता येत आहे. तसेच बरौनी-गोरखपूर राप्तीसागर एक्स्प्रेसही २० ते २५ मिनिटे आधी येत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
...........