रेल्वेगाड्यांची बुकिंग झाली फुल्ल : लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 08:44 PM2020-04-04T20:44:53+5:302020-04-04T20:45:47+5:30
कोरोनामुळे देशभरातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात येऊन बुकिंग रद्द करण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलपासून रेल्वेगाड्यांची बुकिंग ऑनलाईन सुरू करण्यात आली. या काळात प्रवाशांनी १५ एप्रिलपासून प्रवासाचे बुकिंग सुरू केले असून जवळपास सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल झाल्याची स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे देशभरातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात येऊन बुकिंग रद्द करण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलपासून रेल्वेगाड्यांची बुकिंग ऑनलाईन सुरू करण्यात आली. या काळात प्रवाशांनी १५ एप्रिलपासून प्रवासाचे बुकिंग सुरू केले असून जवळपास सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल झाल्याची स्थिती आहे. परंतु रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळालेले नसून रेल्वेत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनने रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू केलेले असले तरी १५ एप्रिलला रेल्वेगाड्या धावतील की नाही, हे निश्चित नाही. रेल्वेगाड्या १५ एप्रिलला सुरू होणार असून तयार राहा, असा कुठलाही आदेश सध्या मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळालेला नाही. नागपूरवरून मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, चेन्नई या चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात. या सर्वच रेल्वेगाड्यांतील बुकिंग जवळपास फुल्ल झाली असून वेटिंगची स्थिती आहे. यात नागपूरवरून दिल्लीला जाणाऱ्या १२४३७ राजधानी एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये केवळ १८ बर्थ शिल्लक आहेत. १२७२३ तेलंगणा एक्स्प्रेस स्लिपर १३४ वेटिंग, १२८०७ विशाखापट्टनम-हजरत निजामुद्दीन समता एक्स्प्रेसमध्ये स्लिपरचे बुकिंंग संपले असून २० वेटिंग आहे. १२८३७ गेवरा रोड अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये सर्व बर्थ फुल्ल झाले आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यात १२१३० आझादहिंद एक्स्प्र्रेस १२ वेटिंग, ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये आरएसी ३०, १२११४ गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये बर्थ फुल्ल झाले आहेत. चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्यात १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस, २२६४७ कोरबा-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस, ११२०३ नागपूर-जयपूर एक्स्प्रेस, १२९६७ जयपूर एक्स्प्रेस आणि १८२३४ बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस फुल्ल झाली आहे.मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यात १२८६० गीतांजली एक्स्प्रेस आरएसी ९६, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस २७ वेटिंग, १२१४० सेवाग्राम एक्स्प्रेस आरएसी १२, १२८१० हावडा-मुंबई मेलमध्ये आरएसी १४ आहे. जवळपास सर्वच दिशांना जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. पूर्वी रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांतील प्रवाशांना लॉकडाऊन संपल्यानंतर तिकिटांची रक्कम देण्यात येणार आहे. परंतु आणखी लॉकडाऊन केल्यास ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांची तिकिटे आपोआप रद्द होऊन रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
आदेश आल्यावरच होतील रेल्वेगाड्या सुरु
‘रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी तयारी करण्याचे कोणतेही आदेश सध्या नागपूर विभागाला मिळालेले नाहीत. रेल्वेगाड्यांची ऑनलाईन बुकिंग सुरू आहे. रेल्वे बोर्डाने आदेश दिल्यास रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत तयारी करण्यात येईल.’
एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.