वारंवार मिळणाऱ्या स्फोटाच्या धमक्यांमुळे रेल्वेला धडकी;नागपूरसह विविध रेल्वे स्थानकांवर हायअलर्ट

By नरेश डोंगरे | Published: November 10, 2024 06:38 PM2024-11-10T18:38:38+5:302024-11-10T18:39:28+5:30

शनिवारी रात्री पुन्हा असाच हायअलर्ट मिळाल्यामुळे नागपूरसह विविध राज्यातील मोठ्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

Trains hit by frequent blast threats; high alert at various railway stations including Nagpur | वारंवार मिळणाऱ्या स्फोटाच्या धमक्यांमुळे रेल्वेला धडकी;नागपूरसह विविध रेल्वे स्थानकांवर हायअलर्ट

वारंवार मिळणाऱ्या स्फोटाच्या धमक्यांमुळे रेल्वेला धडकी;नागपूरसह विविध रेल्वे स्थानकांवर हायअलर्ट

नागपूर : ठिकठिकाणची रेल्वे स्थानकं आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत असतानाच वारंवार स्फोट घडविण्याची धमकी मिळत असल्याने रेल्वे प्रशासन पुरते बेजार झाले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री पुन्हा असाच हायअलर्ट मिळाल्यामुळे नागपूरसह विविध राज्यातील मोठ्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

जैश-ए-मोहम्मदने या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विविध प्रांतातील रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रेल्वे गाड्या, ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावर, परिसरात सशस्त्र जवानांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), डॉग स्कॉडकडून वारंवार गाड्यांची तपासणी केली जाऊ लागली. हे सर्व सुरू असताना रेल्वे गाड्यांमध्ये, स्थानकांवर स्फोट घडवून आणण्याचे धमकीसत्रच सुरू झाले. १४ ऑक्टोबरला राजस्थानच्या हनुमानगडमध्ये आणि २८ ऑक्टोबरला नागपूर स्थानकावर स्फोट करण्याची धमकी मिळाली. १ नोव्हेंबरला दरभंगा येथून दिल्लीकडे निघालेल्या बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची सूचना मिळाली. ८ नोव्हेंबरला अलीगड रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. या सर्व धमक्यांमुळे रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झालेली असताना आता ९ नोव्हेंबरला पुन्हा अलर्ट मिळाल्याने रेल्वे प्रशासनासोबतच सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांचीही (जीआरपी) तारांबळ उडाली आहे.

मोठा सशस्त्र बंदोबस्त

शिर्षस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री रेल्वे पोलीस महासंचालकांकडून रेल्वे पोलिसांना अलर्ट मिळाला. त्यानुसार, नागपूरसह ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर हायअलर्टची स्थिती निर्माण झाली. डे-नाईट असे प्रत्येकी ४५ सशस्त्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि बॉम्ब शोधक तसेच नाशक पथकाला सुरक्षेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरात तैनात करण्यात आले. तेवढेच मणूष्यबळ रेल्वे सुरक्षा दलाकडूनही तैनात करण्यात आले. रेल्वे गाड्या आणि स्थानकाच्या कानाकोपऱ्यातील स्थितीचा आम्ही वारंवार आढावा घेत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संबंधाने 'लोकमत'ला सांगितले.

तो मनोरुग्ण, मात्र...

ऑक्टोबरमध्ये स्फोट घडवून आणन्याच्या धमकीसत्राने देशाच्या विमानसेवेचे पुरते आर्थिक कंबरडे मोडले. विविध विमान कंपन्यांना धमकीचे मेल पाठवून त्यांना बेजार करणारा जगदीश उईके याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर प्राथमिक चाैकशीत तो मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. मात्र, त्याने केलेल्या उपद्रवामुळे विमान कंपन्यांना शेकडो कोटींचा फटका बसला. हजारो प्रवाशांचीही गैरसोय झाली.

जेथून धमकी, तेथेच भीषण स्फोट

जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना पाकिस्तानातून भारतात घातपात घडविण्याचे कट-कारस्थान रचत आहे. जैशने भारतात विविध रेल्वे स्थानकांवर स्फोट घडविण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे, जैशच्या त्याच पाकिस्तानातच कोटा रेल्वे स्थानकावर तेथील दहशतवाद्यांनी शनिवारी भीषण स्फोट घडवून आणला. या स्फोटात मोठ्या प्रमाणात जानमालाची हानी झाल्याचे सर्वश्रूत आहे.
 

Web Title: Trains hit by frequent blast threats; high alert at various railway stations including Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.