नागपूर रेल्वेस्थानक प्लॅटफार्म २ वरून लवकरच धावणार रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:26 AM2018-07-07T00:26:46+5:302018-07-07T00:27:58+5:30
वॉशेबल अॅप्रानचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच प्लॅटफार्म क्रमांक २ वरून रेल्वेगाड्या धावणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वॉशेबल अॅप्रानचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच प्लॅटफार्म क्रमांक २ वरून रेल्वेगाड्या धावणार आहेत. वॉशेबल अॅप्रानच्या कामासाठी या प्लॅटफार्मवरील रेल्वेगाड्या दुसऱ्या प्लॅटफार्मवर वळविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ च्या रेल्वे रुळावर लाकडाचे आणि सिमेंटचे स्लिपर्स लावलेले होते. यातील बहुतांश स्लिपरची अवस्था बिकट झाली होती. याशिवाय प्लॅटफार्मवर गाडी उभी असताना प्रवाशांनी शौचालयाचा वापर केल्यास त्याची सफाई करणेही कठीण झाले होते. या कारणांमुळे प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अॅप्रान तयार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पाडून याचे कंत्राट अजय त्रिपाठी नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आले. त्यामुळे या कामासाठी प्लॅटफार्म क्रमांक २ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्लॅटफार्मवरील रेल्वेगाड्या इतर प्लॅटफार्मवर वळवून ३० मे २०१८ रोजी वॉशेबल अॅप्रानचे काम सुरु करण्यात आले होते. हे काम दिवसरात्र सुरु होते. अखेर २ जुलै २०१८ रोजी हे काम पूर्ण होऊन वॉशेबल अॅप्रान पूर्ण झाला. त्यामुळे या प्लॅटफार्मवरील वळविण्यात आलेल्या रेल्वेगाड्या आता लवकरच प्लॅटफार्म क्रमांक २ वरून धावणार आहेत.