रेल्वेगाड्यांना आता उष्णतारोधक पेंटचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 03:06 PM2018-05-24T15:06:28+5:302018-05-24T15:06:44+5:30
आग लागू नये यासाठी रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे. हा पेंट लावल्यानंतर रेल्वेगाडीतील तापमान बाहेरच्या तापमानाच्या तुलनेत ६ ते ८ डिग्रीने कमी राहील. नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेसपासून या प्रयोगाची सुरुवात केली जाणार आहे.
आनंद शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आग लागू नये यासाठी रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे. हा पेंट लावल्यानंतर रेल्वेगाडीतील तापमान बाहेरच्या तापमानाच्या तुलनेत ६ ते ८ डिग्रीने कमी राहील. नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेसपासून या प्रयोगाची सुरुवात केली जाणार आहे.
वाढलेल्या तापमानामुळे रेल्वेगाड्यांना आग लागण्याच्या तीन घटना नुकत्याच घडल्या. पहिल्या वेळी बडनेराजवळ हावडा-मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागली. दुसऱ्या वेळी मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडीतील सैन्याचे ट्रक जळाले तर, दोन दिवसांपूर्वी ग्वाल्हेर येथे आंध्र प्रदेश एक्स्प्रेसचा एसी डबा जळाला.
त्यामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आगीच्या घटना घडू नये यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला प्रयोग सेवाग्राम एक्स्प्रेसवर केला जाणार आहे. या गाडीच्या छताला पेंट लावला जाईल. त्यामुळे प्रामुख्याने एसी डब्यांतील एअर कंडिशनिंग मोटरवरील दबाव कमी होईल. एसी बंद पडणार नाही. परिणामी, तापमान नियंत्रणात राहून आग लागणार नाही.
तापमान कमी ठेवण्यासाठी रेल्वेगाड्यांच्या छताला उष्णतारोधक लावलेले असते तसेच फायबर ग्लासचा जाडा थर चढवलेला असतो. आता त्यावर उष्णतारोधक पेंटही लावला जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सेवाग्राम एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांना पेंट लावण्याचे काम जून संपण्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. सर्व ऋतुंमध्ये तापमान संतुलित ठेवणे हे या पेंटचे वैशिष्ट्य आहे.
आरआरआय कॅबिनमध्येही पेंट
काही वर्षांपूर्वी इटारसीतील रुट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) कॅबिनला आग लागल्यामुळे रेल्वेसेवा दोन महिन्यांसाठी प्रभावित झाली होती. अशीच आग आठ वर्षांपूर्वी नागपूरमध्ये लागली होती. आरआरआय कॅबिनमधून सिग्नलिंग सिस्टिम कार्य करते व रेल्वेगाड्यांना फलाटावर घेतले जाते. त्यामुळे आरआरआय कॅबिनमध्येही तापमान संतुलित ठेवण्यासाठी उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे.