विना शस्त्रक्रिया बदलली हृदयाची झडप, ७० वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 05:10 PM2021-11-14T17:10:47+5:302021-11-14T17:26:01+5:30

विविध चाचण्या केल्यानंतर हृदयाची झडप बंद झाल्याचे निदान केले. त्यांनी झडप बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा एकदा ‘ओपन हार्ट सर्जरी’ करणे शक्य नव्हते. यामुळे डॉक्टरांनी ‘ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला

transcatheter aortic valve replacement of a 70 year old woman | विना शस्त्रक्रिया बदलली हृदयाची झडप, ७० वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान

विना शस्त्रक्रिया बदलली हृदयाची झडप, ७० वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णाला भूल न देता केली शस्त्रक्रिया

नागपूर : एका ७० वर्षीय रुग्णाच्या हृदयाची शुद्ध रक्तवाहिनीची झडप (अॅओर्टिक वॉल्व) बंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यावर तातडीने ‘वॉल्व’ बदलण्याचा सल्ला दिला. परंतु १९ वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या ‘ओपन हार्ट सर्जरी’मुळे पुन्हा तशाच प्रकारची शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. शिवाय, त्यांना इतरही गंभीर आजार होते. यामुळे डॉक्टरांनी ‘ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व शस्त्रक्रिया न करताच हृदयाचा वॉल्व बदलण्याची प्रक्रिया यशस्वी केली. रुग्णाला जीवनदान मिळाले.

नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेला मागील चार महिन्यांपासून दम लागत होता, श्वास भरुन येत होता, पायावर सूज आली होती. चालणेही अशक्य झाले होते. अखेर ही महिला स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये भरती झाली. येथील इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. पंकज हरकुट यांनी त्यांना तपासले. विविध चाचण्या केल्यानंतर हृदयाची झडप बंद झाल्याचे निदान केले. त्यांनी झडप बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा एकदा ‘ओपन हार्ट सर्जरी’ करणे शक्य नव्हते. शिवाय, रुग्णाचे वय, मधूमेह व उच्चरक्तदाब अशा कोमॉर्बिडिटीज असल्याने मोठी शस्त्रक्रिया करणे धोकादायक होते.

‘लोकमत’शी बोलताना डॉ. हरकुट म्हणाले, अशा वेळी ‘ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’ एक प्रभावी उपचार आहे. या रुग्णावरही हा उपचार करण्यात आला. यामध्ये अॅन्जियोग्राफी व अॅन्जियोप्लास्टी प्रमाणे पायातून एक नळी (कॅथेटर) रक्तवाहिनीद्वारे ह्रदयापर्यंत नेण्यात आली. पेसमेकरद्वारे हृदयाची स्पंदने २५० बीट प्रति मिनिट पर्यंत वाढविण्यात आली. हृदय स्थिर झाल्यानंतर कृत्रिम कॅथेटरद्वारे नेण्यात आलेल्या वॉल्वला हृदयात उघडण्यात आले. तो स्थिर झाल्यानंतर कॅथेटर काढून घेण्यात आले.

विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया करताना रुग्णास भूल देण्यात आली नाही. रुग्ण शुद्धीवर असताना ही प्रक्रिया करण्यात आली. चिरा न दिल्याने चार दिवसातच रुग्णला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, असेही ते म्हणाले. ही शस्त्रक्रिया डॉ. पंकज हरकुट यांच्या मार्गदर्शनात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमोल सोनवणे, कार्डियोथोरॅसिक सर्जन डॉ. सौरव वार्शिणे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. गौरव छाजेड व वॅस्कुलर सर्जन डॉ. रोहितकुमार गुप्ता यांनी यशस्वी केली.

-जोखिम असणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया प्रभावी

ज्यांना ओपन हार्ट सर्जरीमुळे जोखिम आहे, त्यांच्यासाठी ‘ट्रान्सकॅथेटर वॉल्व रिप्लेसमेंट’ एक प्रभावी उपचार पद्धती आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करताही वॉल्व रिप्लेसमेंट शक्य झाले आहे.

-डॉ. पंकज हरकुट, इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट

Web Title: transcatheter aortic valve replacement of a 70 year old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य