नागपुरात वादळामुळे रोहित्राचा चबुतरा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:23 PM2018-06-05T22:23:09+5:302018-06-05T22:23:36+5:30
नागपूर शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच पाणीपुरवठा योजनेसाठी नवेगाव खैरी येथे रोहित्रासाठी उभारण्यात आलेला चार खांबाचा चबुतरा मंगळवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने पेंच- ४ जलशुद्धीकरण कें द्राचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे बुधवारी नागपूर शहराच्या उत्तर व दक्षिण भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच पाणीपुरवठा योजनेसाठी नवेगाव खैरी येथे रोहित्रासाठी उभारण्यात आलेला चार खांबाचा चबुतरा मंगळवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने पेंच- ४ जलशुद्धीकरण कें द्राचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे बुधवारी नागपूर शहराच्या उत्तर व दक्षिण भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. वादळी वारे व पावसामुळे नागपूर शहरातील मानकापूर व अंबाझरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यत सुरळीत झाला नव्हता.
मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास सावनेर,पारशिवनी परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता कि नवेगाव खैरी येथे महापालिकेचा पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या ४ खांबाचा चबुतरा जमीनदोस्त झाला. सोबतच नवेगाव खैरी परिसरास वीजपुरवठा करणारी वाहिनीही क्षतिग्रस्त झाली. नागपूर शहरातही वादळी वाºयासह पावसाच्या सरी आल्या. यामुळे मानकापूर व अंबाझरी भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यत काही वस्त्यातील वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.
नवेगाव खैरी येथील चबुतरा कोसळल्याची माहिती मिळताच महावितरण सावनेरचे कार्यकारी अभियंता डी. एन. साळी यांनी तात्काळ येथे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. नवेगाव खैरी ते मनसर या वाहिनीची लांबी सुमारे ३० किलोमीटर लांब असून जंगलातून जात असल्याने संध्याकाळी ५ नंतर वीज वाहिनीची तपासणी करून बिघाड दुरुस्त करणे पावसामुळे आणि सोसाटयाच्या वाऱ्यामुळे कठीण झाले होते. तरी देखील महावितरणचे अधिकारी-कर्मचारी यांनी वाहिनीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. मोहपा उपविभागातील बोहली,तेलकामठी, कन्हया डोल येथील वीज पुरवठा संध्याळकाच्या वेळी वादळी पावसामुळे खंडित झाला असून तो सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
उत्तर व दक्षिण नागपूरचा पाणीपुरवठा बाधित
वादळामुळे रोहित्राचा चबुतरा कोसळल्याने पेंच प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे बुधवारी उत्तर व दक्षिण नागपुरातील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. यात नारा जलकुंभ, नारी जलकुंभ, जरीपटका जलकुंभ, धंतोली जलकुंभ, श्री नगर डायरेक्ट टॅपिंग, नालंदा नगर जलकुंभ, ओंकार नगर जलकुंभ १ व २, म्हाळगी नगर जलकुंभ, बेझनबाग जलकुंभ, मंगळवारी डायरेक्ट टॅपिंग, इंदोरा जलकुंभ, १० नं. पुलीया डायरेक्ट टॅपिंग व इंदोरा डायरेक्ट टॅपिंग.