लष्कराच्या 'उमंग' मुख्यालयासाठी ११८ टीएचे स्थानांतरण : सीताबर्डी किल्ल्याच्या वैभवाला धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 09:48 PM2020-02-21T21:48:41+5:302020-02-21T21:50:03+5:30
लष्कराची मोठी संस्था असलेले सब-एरिया मुख्यालय मुंबईहून नागपूरला आणण्यात आले असून या मुख्यालयाच्या विस्तारासाठी ११८ टीएला हलविण्यात आल्याची माहिती लष्कराचे माजी अधिकारी कर्नल विपीन वैद्य यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लष्कराची ११८ प्रादेशिक सेना (टेरिटोरियल आर्मी) इन्फन्ट्री बटालियन भुसावळला स्थानांतरणावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी केला आहे. ११८ टीएचे स्थानांतरण हा लष्कराचा आंतरिक निर्णय असून यात राजकारण होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. याउलट टीएच्या तुलनेत लष्कराची मोठी संस्था असलेले सब-एरिया मुख्यालय मुंबईहून नागपूरला आणण्यात आले असून या मुख्यालयाच्या विस्तारासाठी ११८ टीएला हलविण्यात आल्याची माहिती लष्कराचे माजी अधिकारी कर्नल विपीन वैद्य यांनी दिली.
लष्कराची ११८ इन्फन्ट्री बटालियन नुकतीच भुसावळ येथे स्थानांतरित करण्यात आली. त्यामुळे लष्कराची एक मोठी संस्था नागपुरातून बाहेर पळविण्यात आली, विदभार्तील युवकांचा रोजगार हिसकावून घेण्यात आला आहे, सीताबर्डी किल्ल्याचा आता व्यावसायिक वापर करण्यात येणार असून त्याचे ऐतिहासिक वैभव धोक्यात येणार असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून केले जात आहेत. या आरोपांची सत्यता मांडण्यासाठी लष्कराचे माजी अधिकारी पुढे आले आहेत. कर्नल वैद्य, कर्नल रमन दाते आणि कर्नल शेखर मूर्ती यांनी पसरलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. लष्कराची उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात युनिट सब एरिया अर्थात ‘उमंग’चे पूर्वी मुंबईत असलेले मुख्यालय आता नागपूरला आणण्यात आले आहे. ११८ टीए ही सैन्यतुकडी असून त्यांचे प्रत्यक्ष कार्य सीमेवर असते. याउलट उमंग ही लष्कराच्या प्रशासकीय व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. टीए बटालियनमध्ये देशातील ८ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशातील जवान प्रादेशिक सेनेच्या तुकडीत असतात. ही तुकडी गेल्या ८० वर्षांपासून सीताबर्डी किल्ल्यात तैनात होती. यातील अधिकाºयांचे कार्य लष्करात कार्यरत जवानांना प्रशिक्षण देणे असून, प्रशिक्षण प्राप्त जवान जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर कर्तव्यवर जातात. त्यामुळे विदभार्तील युवकांचा रोजगार गेला हा गैरसमज पसरविल्या जात आहे.
उमंगचे कार्यालय गेल्या ६० वषार्पासून मुंबईत होते. त्याचा एक सब एरिया कार्यालय पुणे तर दुसरे नागपुरात होते. पण आता मुंबईचे कार्यालय संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार नागपूरला हलविण्यात आले आहे. जेव्हा एक प्रशासकीय यंत्रणा कुठे हलविण्यात येते त्यावेळी तिच्यासोबत असणारे विविध विभागदेखील स्थलांतरित करण्यात येतात. या विस्तारासाठी जागा आवश्यक होती व त्यामुळे ११८ टीए भुसावळला स्थानांतरित करून ही जागा उमंगला देण्यात आली.
उमंग ही लष्कराचे मोठे युनिट आहे आणि सेना कधी ऐतिहासिक वैभवाला नुकसान करीत नाही. त्यामुळे सीताबर्डी किल्ल्याच्या वैभवाला धोका निर्माण होईल, हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट मत कर्नल वैद्य यांनी व्यक्त केले. हा पूर्णपणे लष्कराचा आंतरिक निर्णय असून त्यात राजकारण असण्याचा प्रश्न येत नाही, असा खुलासाही त्यांनी केला. मात्र लष्कराकडून माहितीचे आदानप्रदान योग्य पद्धतीने झाले नसल्यानेच अनेक गैरसमज निर्माण झाल्याची बाब त्यांनी मान्य केली. प्रत्येक सैनिकाला स्वत:च्या बटालियनबद्दल आत्मीयता असते, त्यामुळे नियमित प्रक्रियेतून घडणारे बदल त्याला दु:ख पोहोचवू शकतात. परंतु प्रशासकीय निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवे, असे आवाहनही या अधिकाºयांनी माजी सैनिकांना केले.
उमंग आल्याने मोठा फायदा
उमंग ही लष्कराची प्रशासकीय व्यवस्था पाहणारी संस्था आहे. त्याचे मुख्यालय देशाच्या हृदयस्थानी आल्याने मोठा फायदा होणार आहे. नागपूर हे मध्यभागी असल्याने सेनेची निर्णयप्रक्रिया वेगाने करण्यास मदत होईल. शिवाय माजी सैनिकांनाही याचा मोठा लाभ मिळत असून आस्थापना, वेतन, पेन्शन, सेवेचे विषय आणि वैद्यकीय सुविधासंबंधी विषयाचा येथेच निपटारा होईल. आधी मुंबईला जावे लागत होते. मुख्यालय आल्यापासून आजवर पेन्शनधारकांचे १ कोटी ४७ लाख रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून माजी अधिकाऱ्यांना ईसीएचएसची सुविधा, सैनिकांना आरामगृह, कॅन्टिनची सुविधा, विविध उपक्रम, कार्यक्रम उमंगनी घेतले असल्याचे कर्नल मूर्ती यांनी सांगितले. स्थानिकांना रोजगाराचाही लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.