जिल्हा मार्गाचे राज्य महामार्गात स्थानांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:12 AM2021-02-28T04:12:29+5:302021-02-28T04:12:29+5:30
कामठी : कामठी तालुक्यातील ७६ किलोमीटरच्या दोन जिल्हा मार्गचे राज्य महामार्गात स्थानांतरण करण्यात आले आहे. या कामासाठी ११७ कोटी ...
कामठी : कामठी तालुक्यातील ७६ किलोमीटरच्या दोन जिल्हा मार्गचे राज्य महामार्गात स्थानांतरण करण्यात आले आहे. या कामासाठी ११७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी दिली.
कामठी तालुक्यातील राज्य महामार्ग - ३४१ ते अजनी, लिहिगाव, कढोली, सावळी, उमरी, वडोदा, आसलवाडा, केसोरी, भामेवाडा, चापेगडी असा एकंदरीत ३८ किलोमीटर व घोरपड, धारगाव, कापसी, तरोडी, खेडी, अडका, शिवनी, चिखली, झरप, वरंभा असा एकंदरीत ३८ किलोमीटरचा जिल्हा मार्ग आहे. या ७६ किलोमीटर मार्गाचे राज्य महामार्गात रूपांतरण करून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भोयर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मार्गाचे राज्य महामार्गात रूपांतरण झाल्यास या भागातील दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा बांधकाम मंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली होती. सदर विषयावर निर्णय घेत चव्हाण यांनी उपरोक्त दोन्ही मार्ग हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत मंजूर करीत यासाठी ११७ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. या रस्त्यामुळे अजनी, गुमथळा, वडोदा व भूगाव सर्कलमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.