कामठीतील बफल फायरिंग रेंज स्थानांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:43 AM2017-10-18T00:43:03+5:302017-10-18T00:43:31+5:30
नागरिक व जनावरांना वारंवार इजा पोहोचण्याच्या घटना लक्षात घेता कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातले बफल फायरिंग रेंज दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी ......
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिक व जनावरांना वारंवार इजा पोहोचण्याच्या घटना लक्षात घेता कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातले बफल फायरिंग रेंज दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याकडे केली.
भामरे यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. त्यात बावनकुळे यांनी संरक्षण मंत्रालयाशी संबंधित विविध प्रश्न मांडले. दरम्यान, सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. कामठीतील बफल फायरिंग रेंजमध्ये झाडण्यात येणाºया गोळ्यांमुळे अनेकदा नागरिक व जनावरे जखमी होतात. अशा घटना टाळण्यासाठी रेंजचे आधुनिकीकरण करण्याचा विचार पुढे आला होता. परंतु, बावनकुळे यांनी रेंजच दुसरीकडे स्थानांतरित करण्याची मागणी लावून धरली. त्यांची मागणी अंतिम निर्णय घेण्यासाठी स्वीकारण्यात आली.
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिराच्या विकासाकरिता राज्य शासनाने १८५.२३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. विकास कामांसाठी मंदिराला लागून असलेली संरक्षण मंत्रालयाची ९.८७ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. त्याऐवजी मंत्रालयाला जांबुळवन, जि. अहमदनगर येथील ३८.८४ हेक्टर जमीन देण्यात आली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. एनएचएआय व मिलिटरी प्रशासन यांच्यातील जमिनीच्या वादामुळे कामठीतील छावणी भागातून जाणाºया महामार्गाचे काम रखडले आहे. भामरे यांनी काम सुरू ठेवण्याचे व हा वाद संयुक्त सर्वेक्षण करून निकाली काढण्याचे निर्देश दिलेत.
बैठकीत आर्मीचे क्वार्टर मास्टर जनरल अशोक आम्रे, डीजीडीई अजयकुमार शर्मा, अतिरिक्त सहायक जनरल राकेश मित्तल, मेजर जनरल डी. व्ही. सेठिया, कामठी ब्रिगेडियर डी. व्ही. सिंग, नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद साळवे, मनपा उपायुक्त रवींद्र देवतळे, नासुप्रचे अधीक्षक अभियंता राजीव पिंपळे, एस. जी. गणोरकर, कामठी गुरुद्वारा समितीचे ब्रिज मल्होत्रा, नरेंद्र भुतानी आदी उपस्थित होते.
अन्य महत्त्वाचे निर्णय
छावणीतील नागरिकांसाठीच्या पाणीपुरवठा योजनेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
कन्हान घाट व छावणीतील महादेव घाटाच्या सौंदर्यीकरणासाठी लीजवर जागा देण्याकरिता संयुक्त सर्वेक्षण करण्यात येईल. राज्य शासनाने कन्हान घाटाकरिता ३९४.४९ तर, महादेव घाटासाठी ४३८.९८ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.
नागपूर-जबलपूर रोडवरील ईदगाहकरिता संरक्षण मंत्रालयाची ९०२५ चौरस फुट जमीन देण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाईल.