राज्यातील ४५ हजार होमगार्डस् व अधिकारीवर्गासह कर्मचाऱ्यांचे पगार एचडीएफसीत ट्रान्स्फर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 07:00 AM2022-07-02T07:00:00+5:302022-07-02T07:00:11+5:30
Nagpur News राज्यातील ४५ हजार होमगार्ड्स आणि कार्यालयीन कामे सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आता एचडीएफसी बँकेतून होणार आहे.
नरेश डोंगरे
नागपूर: राज्यातील ४५ हजार होमगार्ड्स आणि कार्यालयीन कामे सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आता एचडीएफसी बँकेतून होणार आहे. कोट्यवधींच्या या आर्थिक उलाढालीच्या बदल्यात बँकेकडून होमगार्डसना आरोग्य सुविधा आणि विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याच्या पूर्वसंध्येला हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे.
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड प्रत्येक ठिकाणी सेवा देतात. गणेशोत्सव, नवदुर्गा-नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, ईद आणि इतर सर्व सणोत्सवांसह विविध प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी केंद्राने राज्य सरकारला ५३,८७६ होमगार्डची सेवा घेण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र, ही सेवा कायमस्वरूपी नाही. ती नैमित्तिक असल्याने यांपैकी ४५ हजार होमगार्ड राज्य शासनाच्या गृहरक्षक दलाच्या वेतनपटलावर आहेत. या सर्वांकडून अनेकदा धोक्याच्या ठिकाणीही सेवा घेतली जाते. मात्र, पगाराव्यतिरिक्त त्यांना कोणतेही सुरक्षाकवच दिले जात नाही. ही बाब लक्षात घेता, होमगार्डस यांनाही किमान विम्याचे सुरक्षा कवच मिळावे, म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक आणि होमगार्ड महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वर्षभरापासून राज्य शासनाकडे संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून पाठपुरावा चालविला होता. विविध बँकांकडे या संबंधाने विचारणाही करण्यात आली होती. त्याला सर्वांत चांगला प्रतिसाद एचडीएफसीने दिला. या पार्श्वभूमीवर, कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून शासनाने १ जुलैपासून होमगार्डचे वेतन एचडीएफसीतून करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
वार्षिक साडेतीनशे कोटींचा खर्च
होमगार्ड तसेच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर खर्चासंबंधीचा एकूण वार्षिक खर्च ३५० कोटी रुपये आहे. यापूर्वी ४५ हजार खात्यांपैकी २३ हजार वेतन खाती भारतीय स्टेट बँकेत आणि इतर महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक आधी खात्यांत संलग्न होती. मात्र, त्या बदल्यात या बँकांकडून होमगार्डस्ना कोणताही लाभ मिळत नव्हता.
चार लाखांचा विमा
एचडीएफसीच्या ऑफरनुसार होमगार्डसना एकूण ५० लाख रुपयांच्या विम्याचे विनामूल्य कवच देण्याचे कबूल केले आहे. त्यात चार लाखांचा तातडीचा विमा, वैद्यकीय खर्चासाठी रोज विशिष्ट रक्कम यांचाही त्यात समावेश आहे.
हक्काचे सुरक्षाकवच मिळाले - पोलीस महासंचालक
सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे होमगार्ड्स ना त्यांच्या हक्काचे सुरक्षाकवच मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया यासंबंधाने पोलीस महासंचालक आणि राज्याचे होमगार्ड महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले.
---