जिल्हा परिषदेतील ५०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेळापत्रक जाहीर; ९ ते १२ मे दरम्यान विभागनिहाय नियोजन
By गणेश हुड | Published: April 28, 2023 06:46 PM2023-04-28T18:46:32+5:302023-04-28T18:47:08+5:30
Nagpur News शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर २० टक्के बदल्या होणार आहे. यात प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्रत्येकी १० टक्के समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेता ५०० हून अधिक बदल्या होण्याची शक्यता आहे.
गणेश हूड
नागपूर : शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर २० टक्के बदल्या होणार आहे. यात प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्रत्येकी १० टक्के समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेता ५०० हून अधिक बदल्या होण्याची शक्यता आहे. बदल्यांचे वेळापत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार ९ ते १२ मे दरम्यान विभागनिहाय समुपदेशन पद्धतीने सर्वसाधारण बदल्या होणार आहेत.
९ मे रोजी आरोग्य व शिक्षण विभाग, १० मे रोजी वित्त, जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण विभाग, ११ रोजी सामान्य प्रशासन तर १२ मे रोजी पंचायत विभागाच्या बदल्या करण्यात येतील. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय १५ मे २०१४ मधील तरतुदीनुसार शिक्षक संवर्ग वगळून या बदल्या होतील. बदल्यांच्या वेळी पदाधिकाऱ्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात येणार आहे. ५३ वर्षांवरील, विधवा, परित्कत्या, दुर्धर आजार, मतिमंद मुलांचे पालक व इतर निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदली पासून सुट मिळणार आहे. तर विनंती बदल्या करताना रिक्त जागा विचारात घेतले जाणार आहे. प्रशासकीय बदल्या करताना १० वर्ष किंवा दीर्घ वास्तव्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय बदली होणार आहे.
वर्षानुवर्षे दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बदली प्रक्रियेत त्यांचे सोयीचे गाव मिळेल, अशी अपेक्षा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे यांनी व्यक्त केली.
९०६ शिक्षकांच्या बदल्या
शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून ९०६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. बदली झालेल्या शिक्षकांना १ ते १५ मार्चपर्यंत कार्यमुक्त करण्याचे प्रशाकीय आदेश निर्गमित करावयाचे आहे. तर ३१ मे पर्यत प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्यात येणार आहे.