तीन दिवसात तालुकांतर्गत बदल्या
By admin | Published: May 13, 2015 02:45 AM2015-05-13T02:45:30+5:302015-05-13T02:45:30+5:30
जिल्हा परिषदेच्या गट क व ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या १५ मे २०१४ च्या सुधारित शासन धोरणानुसार केल्या जाणार आहे.
नागपूर : जिल्हा परिषदेच्या गट क व ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या १५ मे २०१४ च्या सुधारित शासन धोरणानुसार केल्या जाणार आहे. यात जिल्हास्तरीय बदल्या १६ ते २५ मे दरम्यान तर तालुकांतर्गत बदल्या ५ ते १५ मे २०१५ पर्यत करावयाच्या आहे. याबाबतचे निर्देश ११ मे रोजी प्राप्त झाल्याने प्रशासनाला तालुकांतर्गत बदल्यांची प्रक्रिया तीन दिवसात पार पाडावयाची आहे.
ग्राम विकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव अ.र.कुलकर्णी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे निर्देश दिले आहे. कालावधी कमी असल्याने जि.प.प्रशासन बदल्यांच्या कामाला लागले आहे.
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीबाबत शासनाच्या प्रचलित धोरणाच्या अनुषंगाने सूचना व हरकती मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाच्या ३० मार्च २०१५ च्या पत्रान्वये मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार प्राप्त तक्रारी व सूचनांची छाननी सुरू आहे. परंतु याला विलंब लागणार असल्याने गेल्या वर्षाच्या शासन धोरणानुसार बदल्या केल्या जाणार आहे. (प्रतिनिधी)