वादग्रस्त ठाणेदारांसह १२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:33 PM2023-02-21T15:33:34+5:302023-02-21T15:35:22+5:30
पोलिस आयुक्त ॲक्शन मोडवर; निष्क्रिय असणाऱ्यांवर लवकरच कारवाई
नागपूर : शहर पोलिस दलातील १२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात काही वादग्रस्त ठाणेदारांचाही समावेश आहे. मागील काही काळापासून विविध गुन्हेगार व गुन्ह्यांमुळे चर्चेत आलेल्या ठाणेदारांची संबंधित पोलिस ठाण्यांतून बदली झाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशांवरून या बदल्या झाल्या असून, इतरही निष्क्रिय ठाणेदारांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
सदर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे, तर पाचपावलीचे पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांना सदर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे अमित डोळस यांना सायबर सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी पाठविण्यात आले आहे. व्हीव्हीआयपी हालचालींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सोनेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार डी.डी. सागर यांची गुन्हे शाखेत बदली झाली असून, त्यांच्याऐवजी गुन्हे शाखेतील बी.एस. परदेशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या शुभांगी वानखेडे यांची मानकापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली असून, तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्ही.जे. मांडवधरे यांची बेलतरोडीत बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे विजय मालचे यांची कपिलनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे, तर बेलतरोडीचे सी.एम. यादव यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे. मानकापूरचे पोलिस निरीक्षक सी.डब्लू. चांदोरे यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
वाहतुकचे येगडे विशेष शाखेत
पोलिस नियंत्रण कक्षातील वैभव जाधव यांच्याकडे पाचपावली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक शाखेतील वादग्रस्त बी.बी. येगडे यांना विशेष शाखेत पाठविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही ठाणेदारांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.