नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 08:43 PM2018-05-25T20:43:34+5:302018-05-25T20:43:53+5:30
राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शासनाने दोन वर्षासाठी हे अभियान हाती घेतले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकासावर आधारीत उपक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचा तसेच आवश्यक असलेल्यांना घरकूल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जि.प.च्या ग्रामीण विकास यंत्रणेला दिली आहे. शासनाची यंत्रणा व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी रामटेक भागात मेळावा घेऊन, मोठ्या संख्येने युवकांना यात सहभागी करून घेतले. या संपूर्ण अभियानावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. प्रत्येक पंधरवड्यात अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.
योजनेची आर्थिक उद्दिष्टे
- शेतक ऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
- पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधार करणे
- कुटुंबांना दारिद्र्यरेषेवर आणणे
- ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणे
सामाजिक उद्दिष्ट
- कुटुंबांना पक्की घरे बांधून देणे
- शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे
- सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे
मानवी विकास उद्दिष्ट
- बालमृत्यू दरात लक्षणीय घट करणे
- आरोग्य व स्वच्छतेचा दर्जा सुधारणे
- शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करणे
गावांची निवड
रामटेक : बांद्रा, गर्रा, खुर्सापार, डोंगरगाव, खडगीखेडा, कामठी, सावरा, उसरीपार, सावरा, जमुनिया, टुयापार, फुलझरी, खापा, पिपरिया, सालई, सिल्लारी, तोतलाडोह
पारशिवनी : बोरी, रमजान, सालई, अंबाझरी, मकरधोकडा, सालेघाट, सिलादेवी, सुवरधरा, गारगोटी, पारडी, घाटपेंढरी, किरंगीसर्रा, कोलितमारा, मेहकेपार