हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:22 AM2019-03-19T01:22:12+5:302019-03-19T01:23:11+5:30
पैशांसाठी तृतीयपंथीयांनी हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्ये सोमवारी मध्यरात्री एकच गोंधळ घातला. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसुली करीत त्यांना त्रास देण्याचा सपाटा लावला. अखेर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या १८२ हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर नागपुरात ही गाडी येताच सातही तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पैशांसाठी तृतीयपंथीयांनी हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्ये सोमवारी मध्यरात्री एकच गोंधळ घातला. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसुली करीत त्यांना त्रास देण्याचा सपाटा लावला. अखेर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या १८२ हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर नागपुरात ही गाडी येताच सातही तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली.
माही गुरु रजिया खान (२०), संगीता गुरु रेशमा खान (३२), ऐश्वर्या गुरु शबाना खान (२०), रितिका गुरु रेशमा खान (२८), सोफिया गुरु राधिका खान (२४), राधिका गुरु रेशमा खान (३०) रा. नव्वा कंपनी, मोतीबाग आणि कशीश गुरु कल्याणी बानो (२२) अशी अटक करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत. सोमवारी रात्री हे सातही तृतीयपंथी पैशांची वसुली करण्यासाठी २२८४५ हटिया-पुणे एक्स्प्रेसच्या स्लिपरक्लास कोचमध्ये शिरले. त्यांनी पैशांसाठी प्रवाशांना त्रास देणे सुरू केले. प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या १८२ या हेल्पलाईनवर तक्रार केली. रात्री २.२० वाजता हटिया-पुणे एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येताच रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक एस.पी. सिंग, हेड कॉन्स्टेबल डी.डी. वानखेडे, नीळकंठ गोरे यांनी या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध प्रवाशांशी असभ्य वर्तन करणे, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे आणि भीक मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला.