तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार : गौरी सावंत यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:10 PM2019-12-06T23:10:04+5:302019-12-06T23:12:36+5:30
तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे समाजाने विसरायला नको अशा भावना तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या व देशातील पहिल्या तृतीयपंथी माता गौरी सावंत यांनी व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगामध्ये तृतीयपंथियांचे अस्तित्व अनादी काळापासून आहे. असे असताना त्यांना मागील पाच वर्षात ओळख प्राप्त झाली. हे खेदजनक आहे. तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे समाजाने विसरायला नको अशा भावना तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या व देशातील पहिल्या तृतीयपंथी माता गौरी सावंत यांनी व्यक्त केल्या.
एसजीआर नॉलेज फाऊंडेशन व जी. एच. रायसोनी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाईन्सस्थित सिटणवीस सेंटर येथे आयोजित तीन दिवशीय ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टचा शुक्रवारी समारोप झाला. त्यावेळी मुंबई येथील सावंत यांनी तृतीयपंथियांशी संबंधित विविध मुद्यांवर सडेतोड विचार मांडले. तृतीयपंथी इतर सामान्य व्यक्तीप्रमाणेच असतात. परंतु, समाज त्यांना सहजासहजी स्वीकारत नाही. लिंगावरून व्यक्ती-व्यक्तीमध्ये भेद करणे अयोग्य आहे असे मत सावंत यांनी व्यक्त केले.
सावंत मुलगा म्हणून जन्मल्या होत्या. परंतु, त्यांना नेहमी मुलगी म्हणून वावरावेसे वाटत होते. त्यामुळे त्यांना समाजाकडून बराच त्रास सहन करावा लागला. त्यांनी यासंदर्भातील काही हृदयद्रावक अनुभव श्रोत्यांसोबत वाटले. कुटुंबाने झिडकारल्यामुळे सावंत लहानपणीच घर सोडून निघून गेल्या होत्या. त्यांना कधीही त्या इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे वाटले नाही. त्या स्वत:ला समाजाचा भाग समजत होत्या. त्यांनी शिक्षण घेऊन समाजाच्या विचारसरणीवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यांनी स्वत:चे जीवन तृतीयपंथियांना अधिकार मिळवून देण्यासाठी वाहून टाकले.
सावंत यांनी वेश्या व्यवसायातील मयत महिलेच्या मुलीला दत्तक घेतले आहे. काही समाजकंटक त्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करीत होते. जीवनात कितीही संकटे आली तरी माघार घेऊ नका. समोर येणाऱ्या संकटांना धिराने तोंड द्या असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले. याप्रसंगी सृजनपाल सिंग, दर्शन जारीवालिया, विक्रांत शांडिल्य, मानवेंद्र गोहील, तुहीन सिन्हा, नवीन चौधरी, पुरुषोत्तम अग्रवाल, अरुण आनंद, राधाकृष्णन पिल्लई, प्रियदर्शिनी दत्ता, नंदिता ओमपुरी, डॉ. रंजन वेळूकर आदी उपस्थित होते.