तृतीयपंथीयाने लावला दांपत्याला चुना, पैसे-अंगठ्या घेऊन फरार
By योगेश पांडे | Published: July 18, 2024 05:49 PM2024-07-18T17:49:29+5:302024-07-18T17:51:55+5:30
Nagpur : दांपत्याकडून सर्व स्वखुशीने देत आहे असे घेतले लिहून
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लक्ष्मीनगरच्या पॉश भागात फिरणाऱ्या एका तृतीयपंथीयाने एका वृद्ध दांपत्याला गंडा घातला. त्याने बोलता बोलता त्यांना विश्वासात घेत त्यांचे पैसे व सोन्याची अंगठी घेत पळ काढला.
लक्ष्मीनगरमध्ये संगिता (५५) व सुधीर वानखेडे (६५) हे पती-पत्नी राहतात. १७ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एक तृतीयपंथी त्यांच्या घरी पोहोचला. या परिसरात कुणाचे लग्न आहे का किंवा कुणाकडे बाळाचा जन्म झाला आहे का अशी विचारणा केली. सुधीर यांनी याबाबत कल्पना नसल्याचे म्हटले. माणुसकी म्हणून संगिता यांनी त्याला पाणी पिण्याबाबत विचारले. आरोपीने होकार दिला व पाणी पिले. त्यानंतर सुधीर यांच्याशी बोलताना २१ गरीब मुलांना कपडे घेऊन द्या व जेवण द्या असे म्हटले. त्यासाठी त्याने २१ हजारांची मागणी केली. तेवढे पैसे नसल्याचे सुधीर यांनी स्पष्ट केले.
त्याने एक शेवाळी रंगाचा टी शर्ट खाली ठेवला व त्यात काही दान करायचे असल्यास टाका असे म्हटले. वानखेडे दांपत्याने रोख साडेअकरा हजार रुपये व ४ तसेच ७ ग्रॅमच्या दोन अंगठ्या ठेवल्या. त्याने हे सर्व स्वखुशीने देत आहे असे दोघांकडूनही लिहून घेतले व तो कागद टी शर्टमध्ये ठेवला. त्यानंतर त्याने तो टी शर्ट एका लाल रंगाच्या पिशवीत टाकला व ती पिशवी सुधीर यांच्या हाती दिली. त्यानंतर तो सुधीर यांना घराबाहेर घेऊन गेला व पिशवी स्वत:च्या हाती घेतली. त्यांना घेऊन पुजा करण्याच्या बहाण्याने जेरील लॉनजवळ गेला. तेथे त्यांना पाठमोरा उभे राहण्यास सांगून गायब झाला. सुधीर यांनी वळून पाहिले असता तो दिसलाच नाही. त्यानंतर वानखेडे दांपत्याने त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र तो दिसलाच नाही. संगिता यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे फोटोदेखील व्हायरल झाले असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.