नागपुरात मूत्रपिंड, यकृताचे एकाच रुग्णावर प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:59 AM2018-11-19T09:59:35+5:302018-11-19T10:03:04+5:30

एकाच वेळी एका रुग्णावर मूत्रपिंड व यकृताचे यशस्वी प्रत्यारोपण करून रुग्णाला जीवनदान देण्याची पहिली घटना नागपुरात घडली.

Transplantation of kidney and liver in Nagpur | नागपुरात मूत्रपिंड, यकृताचे एकाच रुग्णावर प्रत्यारोपण

नागपुरात मूत्रपिंड, यकृताचे एकाच रुग्णावर प्रत्यारोपण

googlenewsNext
ठळक मुद्देमध्य भारतात पहिलीच शस्त्रक्रिया दूधपचारे कुटुंबीयांचा अवयवदानात पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच वेळी एका रुग्णावर मूत्रपिंड व यकृताचे यशस्वी प्रत्यारोपण करून रुग्णाला जीवनदान देण्याची पहिली घटना नागपुरात घडली. लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये मध्य भारतातील ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, रस्ता अपघातात ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झालेल्या कर्त्या मुलाचे अवयवदान करून त्याचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या दूधपचारे कुटुंबीयाच्या पुढाकारमुळेच दोघांना जीवनदान मिळाले.
सुरादेवी, कामठी येथील रहिवासी सूरज मनोहर दूधपचारे (२३) असे अवयवदात्याचे नाव आहे. मासेमारी मजूर असलेल्या सूरजवर वृद्ध आई-वडिलांसह लहान भावाची जबाबदारी होती. १५ नोव्हेंबर रोजी नातेवाईकाला आणायला जात असताना कोराडी-महादुला मार्गावर ट्रकने अपघात झाला. त्याला तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. १६ नोव्हेंबर रोजी न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून ब्रेन डेड असल्याची माहिती नातेवाईकांना दिली, सोबतच अवयवदान करण्याचे आवाहनही केले. मजूर असलेले सूरजचे वडील मनोहर, त्याची आई मंदा व काका यांनी त्या दु:खातही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यात सुरादेवीचे सरपंच सुनील दूधपचारे यांनी पुढाकार घेतला. नातेवाईकांकडून अवयवदानाचा होकार मिळताच याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरला (झेडटीसीसी) देण्यात आली. या सेंटरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी, मूत्रपिंड प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. सी.पी. बावनुकळे, ‘रिट्रायव्हल अ‍ॅण्ड ट्रान्सप्लान्टेशन कोआॅर्डिनेटर’ वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

हृदय, फुफ्फुसाला दाता मिळालाच नाही
सूरजचे हृदय व फुफ्फुस दानासाठी दूधपचारे कुटुंबीयांनी होकार दिला होता. परंतु नागपुरात हृदय प्रत्यारोपणासाठी एकाही रुग्णाची नोंदणी झाली नाही. यामुळे झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्यावतीने क्षेत्रीय आणि राष्ट्रीययस्तरावर कळविले. परंतु मर्यादित वेळ, विमान सेवा व दाता उपलब्ध न झाल्याने हृदय व फुफ्फुसाचे दान रखडले, अशी खंत झेडटीसीसीचे सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी ‘लोकमत’ला बोलून दाखविली.

दोन रुग्णांना मिळाले जीवनदान
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. न्यू ईरा हॉस्पिटलचे संचालक न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, कॉर्डिओव्हॅस्क्युलर तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती व डॉ. निधिश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात एका ६५ वर्षीय रुग्णामध्ये एकाच वेळी यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांच्या नेतृत्वात डॉ. वरुण महाबळेश्वर, डॉ. अमित देशपांडे, डॉ. राजीव सिन्हा, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. साहिल बन्सल, डॉ. अनिल यांनी यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण नेफ्रालॉजिस्ट डॉ. शिवनारायण आचार्य यांच्या नेतृत्वात डॉ. रवी देशमुख व डॉ. रोहित गुप्ता यांनी केले. दुसरे मूत्रपिंड प्रत्यारोपण आॅरेंज सिटी हॉस्पिटलमधील एका ५२ वर्षीय रुग्णामध्ये करण्यात आले. यात डॉ. अमित देशपांडे, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. संदीप देशमुख, डॉ. संदीप खानझोेडे आदींनी सहकार्य केले.

११ वे यकृत प्रत्यारोपण
मेंदू मृत दात्याकडून झालेले नागपूर शहरातील हे ११ वे यकृत प्रत्यारोपण तर ६९ व ७० वे मूत्रपिंड प्रत्यारोपण होते. या अवयवदानाच्या माध्यमातून संयम आणि मानवतावादी भूमिकेचे दर्शन घडले. अवयवदानाच्या या चळवळीत प्रत्येकाच्या सहभागाची आवश्यकता आहे.
-डॉ. रवी वानखेडे, सचिव, झेडटीसीसी

Web Title: Transplantation of kidney and liver in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य