जपान, फ्रान्सच्या मदतीतून होणार नागपुरातील नद्यांचा कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:48 AM2019-03-18T06:48:17+5:302019-03-18T06:48:33+5:30

नागनदीच्या प्रदूषण निर्मूलनाच्या १२५२.३३ कोटींच्या प्रकल्पासाठी जपानकडून, तर नागनदी दर्शनी भाग विकासाच्या १६०० कोटींच्या प्रकल्पासाठी फ्रान्सकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे.

Transplanting rivers of Naga through Japan, France | जपान, फ्रान्सच्या मदतीतून होणार नागपुरातील नद्यांचा कायापालट

जपान, फ्रान्सच्या मदतीतून होणार नागपुरातील नद्यांचा कायापालट

googlenewsNext


- गणेश हूड
नागपूर : शहरातील नागनदीच्या प्रदूषण निर्मूलनाच्या १२५२.३३ कोटींच्या प्रकल्पासाठी जपानकडून, तर नागनदी दर्शनी भाग विकासाच्या १६०० कोटींच्या प्रकल्पासाठी फ्रान्सकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. यातून नदीचा कायापालट होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
नद्या प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जायका) ८५ टक्के निधी कर्ज स्वरुपात देणार आहे. प्रकल्पाचे निरीक्षण करण्यासाठी जपानचे तांत्रिक पथक नागपूर दौऱ्यावर आले आहे. मे अखेरीस आपला तांत्रिक अहवाल सादर करतील. या प्रकल्पामुळे नाग नदी, पिवळी नदी व बोरनाल्याला नवसंजीवनी मिळणार आहे.
नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविल्यानंतर फ्रान्सच्या मदतीने नागनदी दर्शनी भागाचा विकास (नागनदी रिव्हर फ्रन्ट डेव्हलपमेंट) प्रकल्प राबविला जाणार आहे. १६०० कोटींचा हा प्रकल्प फ्रान्स सरकारच्या निधीतून राबविला जाईल. फ्रान्सच्या एएफडी तांत्रिक संस्थेने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात चंदीगड, पॉन्डेचरी व नागपूरचा समावेश आहे. एएफडीने प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल सादर केला आहे. अंतिम मास्टर प्लान मार्च अखेरपर्यंत सादर केला जाणार आहे. यात पूर नियंत्रण, नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूचा विकास, नदी काठावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन व अर्बन ट्रान्सपोर्टेशन आदीचा समावेश आहे.

आचारसंहिता संपताच प्रकल्पाला सुरुवात

राष्ट्रीय नद्या संवर्धन योजने(एनआरसीपी)ची मंजुरी घेऊ न महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे. यासाठी केंद्र, राज्य सरकार व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्रकल्पाचे काम सुरू होईल, अशी माहिती नद्या व सरोवरे विभागाचे उपअभियंता मोहम्मद इसराईल यांनी दिली.

Web Title: Transplanting rivers of Naga through Japan, France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.