शहरसेवेत मार्चपर्यंत २३७ सीएनजी व इलेक्ट्रिक बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 12:25 PM2022-01-07T12:25:54+5:302022-01-07T12:52:04+5:30
महापालिकेच्या शहर बससेवेत असलेल्या जेएनएनयूआरएमच्या २३७ स्टँडर्ड डिझेल बसचे आयुष्य संपले आहे. या बसेस भंगारात काढून मार्च २०२२ पर्यंत सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या नवीन २३७ बसेस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
नागपूर : महापालिकेच्या शहर बससेवेत असलेल्या जेएनएनयूआरएमच्या २३७ स्टँडर्ड डिझेल बसचे आयुष्य संपले आहे. या बसेस भंगारात काढून मार्च २०२२ पर्यंत सीएनजी (CNG Bus) व इलेक्ट्रिकवर (Electric Bus) धावणाऱ्या नवीन २३७ बसेस आपली बसच्या (Aapli Bus) ताफ्यात दाखल होणार आहेत.
आपली बसच्या ताफ्यात ४३८ बसेस आहेत. यात वर्ष २०१० मध्ये जेएनएनयूआरअंतर्गत मिळालेल्या २३७ बसचा समावेश आहे. दहा वर्षे आयुष्य गृहीत धरता या बसेस भंगारात काढण्यात येणार आहे. गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. परिवहन समितीच्या अर्थसंकल्पात आपली बससेवा पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या नवीन बसेस खरेदी करण्याचे निर्देश तीन बस ऑपरेटरला देण्यात आल्याची माहिती परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागाकडून १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार नागपूर शहराचा समावेश नागरी समूहामध्ये करण्यात आला आहे. सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीकरिता एकूण २४९ कोटींपैकी ८० टक्के निधी वापरांतर्गत १९९.२० कोटींचा निधी विद्युत वाहनासाठी मिळणार आहे. यातून ई-बस खरेदी करणार आहे.
प्रदूषणमुक्त परिवहन सेवा
पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त परिवहन सेवा असावी, असा मनपाचा प्रयत्न आहे. यासाठी शहर बस सेवेतील डिझेल बसचे सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्याचे काम सुरू आहे. लवकरच डिझेलच्या सर्व बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
ऑपरेटर नवीन बसेस खरेदी करणार
मनपाची शहर बस सेवा आर. के. सिटीबस सर्व्हिसेस, मेसर्स ट्रॅव्हल टाईम बस सर्व्हिसेस आणि मेसर्स हंसा बस सर्व्हिस या तीन ऑपरेटरच्या माध्यमातून संचालित केली जाते. मनपा व बस ऑपरेटर यांच्यात झालेल्या करारानुसार जेएनएनयूआरएमच्या बसचे आयुष्य संपल्यानंतर ऑपरेटरला नवीन २३७ बस खरेदी करावयाच्या आहेत, अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली.
१०० मिडी ई-बस मिळणार
केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत नागपूर शहराकरिता अनुदानानुसार मंजूर १०० बसेसपैकी प्रथम टप्प्यात ४० मिडी ई-बसेस दाखल होत आहेत. उर्वरित ६० मिडी ई-बसेस अनुदानासह खरेदी करण्याचा मानस आहे. अनुदान प्राप्तीकरिता प्रस्ताव पाठविण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.