परिवहन विभागाचे निर्देश : आता नव्या वाहनांचेही फिटनेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:25 PM2018-10-02T19:25:08+5:302018-10-02T19:25:59+5:30
राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदाारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसे योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या संदर्भाचे आदेश परिवहन विभागाने नुकतेच काढले आहे. परंतु याला घेऊन निरीक्षकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदाारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसे योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या संदर्भाचे आदेश परिवहन विभागाने नुकतेच काढले आहे. परंतु याला घेऊन निरीक्षकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.
सर्वाधिक महसूल मिळवून देण्यामध्ये अग्रेसर असलेल्या राज्याच्या परिवहन विभागामध्ये एकूण ५,१०० पदांमधून २,२५६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रतीक्षा परिवहन विभाग करीत आहे. प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कणा असलेल्या मोटार वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मोटार वाहन निरीक्षकांची मंजूर असलेल्या ८६७ पदांपैकी ३७३ पदे रिक्त आहेत, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर १३०२ पदांपैकी १००८ पदे रिक्त आहेत. यातच रोज शेकडो नव्या वाहनांची नोंदणी करणाऱ्या आरटीओ कार्यालयांवर कामाचा ताण पडला आहे. विशेषत: वाहन परवान्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेणे, चाचणी घेणे, परवाना देणे, वाहनांची नोंदणी करणे, योग्यता प्रमाणपत्र देणे, वाहन तपासणी आदी कामांची जबाबदारी निरीक्षकांवर आहे. कामे जास्त आणि अधिकारी कमी, अशा कचाट्यात आरटीओ कार्यालये सापडली आहेत. आता आणखी एकाचा कामाचा भार निरीक्षकांवर देण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार निरीक्षकांना नवीन वाहनांची तपासणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. एकीकडे रोजच्या कामावर कॅमेऱ्यांची नजर, कामात चूक झाल्यास निलंबनाची टांगती तलवार त्यात हे नवे काम समोर आल्याने निरीक्षकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.