जीवनावश्यक वस्तूंच्या १९० मालगाड्यांची वाहतूूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:02 PM2020-03-26T21:02:09+5:302020-03-26T22:38:09+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे. त्यासाठी मध्य रेल्वेचे सर्व गुड्स शेड, रेल्वेस्थानक आणि नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी काम करीत आहेत.
मध्य रेल्वेने मागील चार दिवसात २२ ते २५ मार्च दरम्यान १९० मालगाड्यांच्या ९८३७ वॅगनमध्ये जवळपास ५.६६ लाख टन जीवनावश्यक वस्तू आणि कोळशाची वाहतूक केली. यात कोळशाचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील कोराडी, मौदा, परळी, नाशिक, पारस शिवाय मध्य प्रदेशातील सारणी आणि सिंघाजी येथील पॉवर प्लँटसाठी १०२ मालगाड्यात कोळसा पाठविण्यात आला आहे. यातील १०० मालगाड्या नागपूर आणि दोन मालगाड्या मुंबईवरून चालविण्यात आल्या. तर खापरी, तडाली, गायगाव आदी डेपोमध्ये पेट्रोल, ल्युब्रिकंट आणि ऑईलने भरलेल्या १७ मालगाड्या चालविण्यात आल्या. यात भुसावळवरून १३ मालगाड्या गेल्या. येथून कांद्याने भरलेली एक मालगाडी रवाना झाली. तर ५७ पैकी ४६ मालगाड्या मुंबईवरून निघाल्या. यात फर्टिलायझरच्या ६ मालगाड्या मुंबई विभागातून उत्तर आणि दक्षिण भारताकडे रवाना करण्यात आल्या. मालगाड्यांच्या वाहतुकीवर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.