बनावट परवान्याने बेहडा जातीच्या लाकडांची वाहतूक, आरोपीस अटक
By दयानंद पाईकराव | Published: March 24, 2023 08:53 PM2023-03-24T20:53:03+5:302023-03-24T20:53:59+5:30
बनावट परवान्याच्या आधारे बेहडा जातीच्या लाकडाची वाहतूक करणाºया आरोपीला वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले
नागपूर :
बनावट परवान्याच्या आधारे बेहडा जातीच्या लाकडाची वाहतूक करणाºया आरोपीला वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने आरोपीला २७ मार्च पर्यंत वन कोठडी दिली आहे.
सेमीनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील कापसी परिसरात बेहडा जातीच्या लाकडांची इतर जिल्ह्यातून बनावट वाहतूक परवान्याद्वारे वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा , सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कँपा) सुरेंद्र काळे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी २३ मार्चला भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सारीका वैरागडे आणि वनविभागाच्या पथकाने सापळा रचून एका वाहनाला थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यात मध्ये बेहडा या प्रजातीची लाकडे असल्याचे आढळून आले.
सदर लाकडाबाबत वाहनचालकाने दाखविलेला परवाना जळगाव वन विभागाने जारी केलेला असल्याचे आढळले. वन विभागाच्या पथकाने जळगाव वनविभागीतल संबंधीत अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी हा परवाना जारी केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाºयांनी ट्र्क क्रमांक एम. एच. २८, बी. आर-७७८८ आणि ट्रकचालकास ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास २७ मार्चपर्यंत वन कोठडी दिली. ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. भरत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका वैरागडे, वनपाल कुरेशी, वनपाल ए. के. गडे, ओ.बी. चौरागडे, एस. एल. पांडे, एन. एल. वाघ, वनरक्षक सचिन राघोर्ते, राठोड वनरक्षक, ए. एन. तिडके, एस. जि. नेवारे आदींनी केली.