परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका, आरटीओतील गैरप्रकार, शासनाकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:07 AM2023-03-29T00:07:17+5:302023-03-29T00:07:34+5:30

Nagpur News: एका ठिकाणी कार्यरत असताना दुसऱ्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे सांगून शासनाकडून लाभाचेे पद पदरात पाडून घेण्याची बनवाबनवी उघड झाली आहे.

Transport officer Chavan accused of misleading the government, malpractice in RTO, serious notice from the government | परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका, आरटीओतील गैरप्रकार, शासनाकडून गंभीर दखल

परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका, आरटीओतील गैरप्रकार, शासनाकडून गंभीर दखल

googlenewsNext

नागपूर : एका ठिकाणी कार्यरत असताना दुसऱ्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे सांगून शासनाकडून लाभाचेे पद पदरात पाडून घेण्याची बनवाबनवी उघड झाली आहे. त्यामुळे येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका परिवहन खात्या (आरटीओ)कडून ठेवण्यात आला आहे. परिणामी चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

चव्हाण यांनी २२. ११. २०२२ ला शासनाला एक विनंती अर्ज केला होता. या अर्जात त्यांनी ते उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गोंदिया येथे कार्यरत असून, नागपूर विभागात ते सर्वात वरिष्ठ तसेच अनुभवी अधिकारी असल्याचे नमूद केले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर (ग्रामीण) तसेच नागपूर (शहर) येथील अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याची विनंती केली होती. त्याचमुळे शासनाकडून अर्थात परिवहन खात्याकडून चव्हाण यांना नागपुरातील पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.

दरम्यान, चव्हाण यांनी पदभार घेतल्यानंतर नागपूर आरटीओत सरळ दोन गट पडले आणि खाबुगिरीच्या मुद्द्यावरून एक दुसऱ्यावर दोन्ही गटाकडून कुरघोड्या सुरू झाल्या. कमाईच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी नंतर खोट्या तक्रारीचाही सपाटा लागला. हे सुरू असताना आरटीओच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम टाऊन मध्ये येऊन बदल्यांचा बाजार मांडण्याची हिम्मत दाखविली. त्याचा लोकमतने पर्दाफाश करून राज्यभर खळबळ उडवून दिली. या वृत्त मालिकेची शासनाने गंभीर दखल घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरटीओच्या बदल्यात होणारा कोट्यवधींचा गैरव्यवहार संपविण्यासाठी या प्रकरणाची चाैकशी करण्यासोबतच बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे आदेश दिले. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी बदल्यांच्या बाजारातील गैरप्रकाराची चाैकशी करण्यासाठी एसआयटीकडून चाैकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. हे सर्व सुरू असतानाच आरटीओतील अनेक गैरप्रकारांची चाैकशी सुरू झाली. चव्हाण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली असताना त्यांनी शासनाला आपण गोंदिया येथे कार्यरत असल्याचे सांगितल्याचे अर्थात चव्हाण यांनी शासनाची दिशाभूल केल्याचेही उघड झाले. त्यामुळे चव्हाण यांच्यावर ठपका ठेवून त्यांना या प्रकरणात परिवहन आयुक्तालयातून सोमवारी, २७ मार्चला पत्रवजा नोटीस जारी करण्यात आली.


तीन दिवसांचा अवधी
चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केल्यामुळे चव्हाण यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न या नोटीसमध्ये अप्पर परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केला आहे. या संबंधाचा खुलासा तीन दिवसांत सादर करण्याचेही निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या घडामोडीची माहिती परिवहन खात्यातील वरिष्ठांसोबत गृहविभागालाही देण्यात आली आहे. या संबंधाने परिवहन अधिकारी चव्हाण यांच्याशी प्रस्तूत प्रतिनिधीने वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Transport officer Chavan accused of misleading the government, malpractice in RTO, serious notice from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.