पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्यांची बंदोबस्तात वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:34 AM2020-04-24T00:34:40+5:302020-04-24T00:37:06+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु आहे. या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु आहे. या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे मागील महिनाभरात एकाही मालगाडी किंवा पार्सल रेल्वेगाडीत चोरीची घटना घडली नाही.
रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु ठेवली आहे. या गाड्यांमधून कोळसा, पेट्रोल, खाद्यपदार्थ, वैद्यकीय उपकरणे, औषधांची वाहतूक होत आहे. अनेकदा मालगाड्या आणि पार्सल गाड्यांमध्ये चोरीच्या घटना घडतात. परंतु अशा घटना घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने खबरदारी घेतली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण ७० पार्सल रेल्वेगाड्या आणि ६५ मालगाड्यात आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ६३ पार्सल रेल्वेगाड्या आणि ४० मालगाड्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले. एका मालगाडी तसेच पार्सल रेल्वेगाडीत तीन आरपीएफचे जवान तैनात करण्यात येत आहेत. या जवानांमुळे जीवनावश्यक वस्तूंची सुरक्षित वाहतूक होत असून मागील महिनाभरात एकही चोरीची घटना घडली नाही.
चोरीच्या घटनांसाठी आरपीएफ जवान तैनात
‘मालगाड्यात आणि पार्सल रेल्वेगाड्यात अनेकदा चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक मालगाडी व पार्सल रेल्वेगाडीत आरपीएफचे दोन ते तीन जवान तैनात करण्यात येत आहेत. यामुळे चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात यश मिळाले आहे.’
आशुतोष पाण्ड्येय, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, नागपूर विभाग