सूरजागड प्रकल्पातून रोज १० हजार टन लोहखनिजाची वाहतूक
By नरेश डोंगरे | Published: July 19, 2024 08:05 PM2024-07-19T20:05:35+5:302024-07-19T20:05:47+5:30
लोडिंगची प्रक्रिया होणार डिजिटल : गैरप्रकार टाळून प्रक्रिया पारदर्शी करण्याचा दावा
नागपूर: मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लोहखनिजाच्या लोडिंग आणि वाहतूकप्रक्रियेत कसलीही मानवी चूक राहू नये किंवा त्यात गैरप्रकार होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता पारदर्शी होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या प्रशासनाने केला आहे.
बल्लारशाह लोडिंग शेड हा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा वाहतुकीसाठी आधारस्तंभ मानला जातो. कारण येथून सर्वाधिक १० हजार टन लोहखनिजाची रोज लोडिंग होते. लॉयड्स मेटल्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत सूरजागढ येथून उत्खनन केलेले हे खनिज रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या प्रांतातील स्टील प्लांटमध्ये पाठविले जाते.
आतापर्यंत या खनिज वाहतुकीसाठी खाण खात्याची मंजुरी घ्यावी लागत होती. ती कुणाकडून केली जाणार त्या ग्राहकांची माहिती, त्याचेप्रमाण, कोणत्या मार्गाने कोणत्या स्थानावर जाणार, याची तपशीलवार माहिती देणे आणि त्याची पडताळणी करणे आवश्यक होते. त्यात मोठा वेळ जात होता आणि गैरप्रकारालाही संधी होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गुड्स ऑपरेशन्स इन्फॉर्मेशन सिस्टीम (एफओआयएस) तसेच राज्य खाण विभागाच्या एकात्मिक खाण आणि खनिज व्यवस्थापनाची (आयएलएमएस) प्रणाली डिजिटलायझेशनच्या माध्यमातून संलग्न केली आहे. त्यामुळे चुका आणि गैरप्रकार टाळून याप्रक्रियेत पारदर्शीपणा येणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
२२ जुलैपासून अंमलबजावणी
रेक परमिट जारी करण्याची प्रक्रिया दि. २२ जुलैपासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर हलविली जाणार असून, त्याचवेळीपासून आवश्यक त्या परवानगीसुद्धा उपलब्ध होणार आहे. भूगर्भशास्त्र आणि खाण संचालनालयाने महासंचालक डॉ. टी. आर. के. राव आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी संयुक्तरीत्या हा निर्णय जाहीर केला आहे.