नागपुरात ट्रान्सपोर्टरचे अपहरण व हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:21 AM2019-04-29T10:21:52+5:302019-04-29T10:23:32+5:30

चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेले जरीपटक्यातील वाहतूक व्यावसायिक बॉबी ऊर्फ भूपेंद्रसिंग मंजितसिंग माकन (वय ४६, रा. दीक्षितनगर) यांचा मृतदेह कोंढाळीजवळच्या कातलाबोडी शिवारात आढळला.

Transporter abduction and murder in Nagpur | नागपुरात ट्रान्सपोर्टरचे अपहरण व हत्या

नागपुरात ट्रान्सपोर्टरचे अपहरण व हत्या

Next
ठळक मुद्देकोंढाळीजवळ आढळला मृतदेहबेदम मारहाणीनंतर गळा आवळलापुलावरून खाली फेकला मृतदेहअ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रूप केला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेले जरीपटक्यातील वाहतूक व्यावसायिक बॉबी ऊर्फ भूपेंद्रसिंग मंजितसिंग माकन (वय ४६, रा. दीक्षितनगर) यांचा मृतदेह कोंढाळीजवळच्या कातलाबोडी शिवारात आढळला. अपहरणानंतर गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह पुलावरून खाली फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपहरण आणि हत्येच्या या घटनेमुळे उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.
कामठी मार्गावरील आॅटोमोटिव्ह चौकाजवळ बॉबी माकन यांचे दशमेश (डीटीसी) ट्रान्सपोर्ट नावाचे कार्यालय असून, त्यांचे दुसरे कार्यालय पाचपावलीतील कमाल चौकाजवळही आहे. गुरुवारी मध्यरात्री ते अचानक बेपत्ता झाले. त्यांचे तीनही फोन बंद होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या पत्नीने आधी पाचपावली आणि नंतर जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळीच त्यांच्या पत्नीने अपहरण आणि घातपाताची शंका व्यक्त केली होती. मात्र, पोलिसांनी मिसिंगची नोंद घेत शांत राहणे पसंत केले. दोन दिवस होऊनही बॉबी माकण यांचा पत्ता लागला नसल्याने अस्वस्थ नातेवाईकांनी धावपळ वाढली. त्यानंतर शनिवारी पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या.
दरम्यान, त्यांची शोधाशोध सुरू असतानाच कातलाबोडी शिवारात पुलाच्या खाली एका व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळाली. मृताचा गळा आवळून हत्या केल्यानंतर पुलावरून त्यांचा मृतदेह खाली फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला. त्याच्या डोक्यावर, पोटावर आणि हातावर जबर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्यांनी त्यांचा चेहरा अ‍ॅसिड टाकून विद्रूप केला होता. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ग्रामीण आणि शहर पोलिसांना माहिती कळविली. त्यावरून मृताच्या वर्णनाशी मिळताजुळती व्यक्ती जरीपटक्यातून बेपत्ता असल्याचे कोंढाळी पोलिसांना कळाले. त्यामुळे तेथील ठाणेदार श्याम गव्हाणे आणि उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर यांनी जरीपटका पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर जरीपटका पोलीस तसेच माकण यांचा मेव्हणा तेथे पोहचला. त्यांनी तो मृतदेह बॉबी माकण यांचाच असल्याची ओळख पटविली. हे वृत्त धडकताच उपराजधानीत मोठी खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी माकण यांचा मृतदेह मेडिकलमध्ये आणून काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

सुपारी देऊन गेम
प्रारंभी रॉकेलची काळाबाजारी नंतर ट्रान्सपोर्ट, जुगार अड्डा, प्रॉपर्टी डीलिंग आणि सट्टेबाजीमुळे माकन यांचा अनेकांशी आर्थिक व्यवहार बिघडला होता. त्यावरून त्यांचा अनेकांशी वाद होता, त्यात अनेक गुन्हेगारांसोबतही त्यांचे वैर होते. पाचपावलीतील कमाल चौकाजवळच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर कब्जा असल्याने पोलिसांना वाँटेड असलेल्या गुन्हेगारासोबतही त्यांचे अनेक दिवसांपासून वैर होते. त्यामुळे आर्थिक व्यवहारातून सुपारी देऊनच त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळेच पोलिसांनी उत्तर नागपुरातील एका गुन्हेगारासह मोरयानी नामक व्यक्तीचीही चौकशी चालविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांना त्यांच्याकडून कसलाही धागादोरा मिळाला नसल्याचे सांगितले जाते.

सराईत गुन्हेगारांचा समावेश
माकन यांचे गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या कार्यालयातून मारेकºयांनी अपहरण केले. कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराही तोडण्यात आला. त्यांचे तीनही मोबाईल बंद होते. दुसºया दिवशी दुपारी त्यांची कार साई मंदिराजवळ बेवारस अवस्थेत आढळली. त्यामुळे त्यांचे घातपाताच्या मनसुब्यातूनच अपहरण करण्यात आल्याची शंका पत्नीने पोलिसांकडे व्यक्त केली होती. याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने तपास केला असता तर माकन जिवंत पोलिसांच्या हाती लागू शकले असते. मात्र, पोलिसांनी पूर्ण दोन दिवस गमावले. त्यानंतर आज रविवारी सकाळी त्यांचा मृतदेहच पोलिसांना आढळला. त्यांच्या शरीरावरील मारहाणीच्या जखमा ओल्या असल्यामुळे मारेकºयांनी शनिवारी रात्री किंवा मध्यरात्रीनंतर त्यांची हत्या केली असावी, असा संशय आहे. या हत्याकांडात सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

Web Title: Transporter abduction and murder in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून