नागपुरात ट्रान्सपोर्टरला ७५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:26 AM2019-05-26T00:26:41+5:302019-05-26T00:28:38+5:30
ऑटो डीलिंगच्या नावाखाली एका ट्रान्सपोर्टरसोबत आठ ट्रकचा सौदा करून त्यांच्याकडून एका त्रिकुटाने ७५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता आरोपींनी ही रक्कम संगनमत करून हडपली. वर्षभरानंतर या प्रकरणाची तक्रार झाल्याने पाचपावली पोलिसांनी आरोपी सगीर अहमद ऊर्फ पाशाभाई शकीर अहमद, शाहीन सुलतान सगीर अहमद आणि जगीर अहमद सगीर अहमद या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटो डीलिंगच्या नावाखाली एका ट्रान्सपोर्टरसोबत आठ ट्रकचा सौदा करून त्यांच्याकडून एका त्रिकुटाने ७५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता आरोपींनी ही रक्कम संगनमत करून हडपली. वर्षभरानंतर या प्रकरणाची तक्रार झाल्याने पाचपावली पोलिसांनी आरोपी सगीर अहमद ऊर्फ पाशाभाई शकीर अहमद, शाहीन सुलतान सगीर अहमद आणि जगीर अहमद सगीर अहमद या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी मेहंदीनगरात राहतात.
फिर्यादी भगवंतसिंग निर्जनसिंग गिल (वय ५२, रा. बाबा बुद्धाजीनगर, नागपूर) हे ट्रान्सपोर्टर आहेत. त्यांचे गिल ट्रान्सपोर्ट नावाने पाचपावलीत कार्यालय आहे. उपरोक्त आरोपी ऑटो डीलिंगच्या व्यवसायात आहेत. त्यामुळे गिल आणि आरोपींची ओळखी होती. फेब्रुवारी २०१८ मध्ये आरोपींनी गिल यांना आठ ट्रक स्वस्त किमतीत आणून देतो, अशी बतावणी केली. त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात २३ फेब्रुवारी ते १३ जून २०१८ या कालावधीत ७५ लाख ५० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. गिल यांनी आरोपींच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर आरोपींनी गिल यांना आठ ट्रक आणून दिले, मात्र त्याची एनओसी दिली नाही. विना हरकत प्रमाणपत्राशिवाय हे ट्रक चालविणे शक्य नसल्याने गिल यांनी त्यांच्यामागे तगादा लावला. एनओसी द्या किंवा ट्रक परत नेऊन आपली रक्कम परत करा, असे गिल यांनी आरोपींना सांगितले. त्यामुळे आणलेले ट्रक आरोपी परत घेऊन गेले. ते विकून रक्कम आणून द्यायचे ठरले होते. आरोपींनी ट्रकही नेले आणि रक्कमही परत केली नाही. वर्षभरापासून टाळाटाळ करणारे आरोपी आपली रक्कम परत करणार नाही, त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अखेर गिल यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.