नागपूर रेल्वेस्थानकावर फेस रिकग्नाईज कॅमेरे करतील गुन्हेगारांना ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:58 AM2018-08-02T10:58:14+5:302018-08-02T11:02:59+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक २४० कॅमेरे लावण्यात येत आहेत. यात चेहरा (फेस रिकग्नाईज) ओळखणाऱ्या चार कॅमेऱ्यांचा समावेश आहे.
दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. रेल्वेस्थानकावर यापूर्वी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे अत्याधुनिक २४० कॅमेरे रेल्वेस्थानकावर लावण्यात येत आहेत. यातील २०० कॅमेरे रेल्वेस्थानकाच्या कानाकोपऱ्यात लावले असून आगामी १५ आॅगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा (फेस रिकग्नाईज) ओळखणाऱ्या चार कॅमेऱ्यांचा समावेश आहे. यात एखाद्या गुन्हेगाराचा फोटो अपलोड केला आणि पुन्हा तो गुन्हेगार या कॅमेऱ्यासमोर आल्यास हा कॅमेरा आरपीएफच्या नियंत्रण कक्षात अलार्म देईल. त्यानुसार संबंधित गुन्हेगाराला पकडणे सहज शक्य होणार आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १५० रेल्वेगाड्या आणि ३५ ते ४० हजार प्रवासी ये-जा करतात. नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे येथे सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीम ही अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी युक्त यंत्रणा बसविण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. यावर्षी ही योजना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर २४० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातील २०० कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. आगामी १५ दिवसात उर्वरित ४० कॅमेरे बसविण्यात येणार असून १५ आॅगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असा विश्वास रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी व्यक्त केला.